पिंपरी I झुंज न्यूज : वाकडमध्ये चालू असलेल्या बांधकामाची इमारत एका बाजूला अचानकपणे झुकल्याचा धक्कादायक प्रकार काल रात्री समोर आला होता. सध्या इमारतीला खालून जेसीबीच्या सहाय्याने सपोर्ट देण्यात आला आहे. मात्र ही इमारत आता जमीनदोस्त करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील यांनी दिली आहे.
काल रात्री वाकड मधील बांधकाम सुरू असलेली इमारत एका बाजूला झुकली असल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर प्रशासनाने तातडीने अग्निशामक दल व पोलिस यंत्रणा घटनास्थळी दाखल करत परिसर रिकामा करण्यास सुरुवात केली होती. हे बांधकाम वाय पद्धतीचे म्हणजेच चार ऐवजी दोन पिलरवर उभारण्यात आल्यानं अशी परिस्थिती उदभवल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. या इमारतीचे मालक सुनील दोलवानी हे असून आर्किटेक्ट मल्लिकार्जुन आंबेगावे हे आहेत. तळमजला अधिक तीन मजले या बांधकाम पद्धतीवर उभारणे जीवघेणे ठरणार, असा निष्कर्ष रात्री काढण्यात आलेला होता.
आता ही झुकलेली इमारत काही वेळातच जमीनदोस्त करण्यात येणार आहे. काल रात्री ही इमारत झुकल्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरले होते. मात्र प्रशासनाने वेळेत घटनास्थळी धाव घेऊन या इमारतीला जेसीबी आणि पोकलेनच्या साह्याने सपोर्ट दिला होता. आता ही इमारत जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला असून काही वेळातच ही कार्यवाही सुरू होणार आहे दरम्यान याप्रकरणी या इमारतीचा मालक तसेच आर्किटेक यांच्यावर योग्य ती कडक कारवाई केली जाईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिली.