पुणे I झुंज न्यूज : अॅटिव्ह टीचर्स सामाजिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारे प्रतिष्ठेचे उत्कृष्ट बाल साहित्य पुरस्कार प्रसिद्ध बालसाहित्यिक सचिन बेंडभर यांच्या दिलीपराज प्रकाशनने प्रकाशित केलेल्या मामाच्या मळ्यात या बालकाव्यसंग्रहास जाहीर झाला असल्याची माहिती प्रतिष्ठानचे राज्य संयोजक विक्रम अडसूळ यांनी नुकतीच दिली. या काव्यसंग्रहास 2024 सालचा हा दुसरा पुरस्कार असून रोख रक्कम, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या 11 फेब्रुवारी रोजी ठाण्यात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
अॅटिव्ह टीचर्स सामाजिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्या वतीने 2023 मध्ये प्रकाशित झालेल्या साहित्यास राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङमय पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून प्रवेशिका आल्या होत्या. बालसाहित्य विभागात पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध बालसाहित्यिक सचिन बेंडभर यांच्या मामाच्या मळ्यात या कवितासंग्रहाला प्रथम क्रमांक मिळाला असून प्रतिष्ठानच्या वतीने उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार प्रतिष्ठानचे राज्य संयोजक विक्रम अडसूळ यांनी नुकताच जाहिर केला.
सचिन बेंडभर यांच्या काव्यसंग्रहास 2024 सालचा हा दुसरा पुरस्कार असून याआधी चंद्रपूर येथील कवितेचे घर यांच्यावतीने बापूरावजी पेटकर बालकाव्य पुरस्कार असे प्रतिष्ठेचे मानले जाणारे पुरस्कार या काव्यसंग्रहास मिळाले आहेत. या काव्यसंग्रहासाठी 2024 सालचा हा मानाचा सन्मान असून या काव्यसंग्रहास निवड समितीने प्रथम क्रमांक जाहीर केला आहे.
मामाच्या मळ्यात या काव्यसंग्रहात लहान मुलांसाठी मनोरंजनात्मक कविता असून त्यांच्या ज्ञानात भर पडेल अशा प्रेरक कवितांचा समावेश आहे. लहान बाल चमुंसाठी संस्काराची शिदोरी म्हणजे सचिन बेंडभर यांचा मामाच्या मळ्यात हा काव्यसंग्रह!
दिलिपराज प्रकाशनने हा काव्यसंग्रह प्रकाशित केला असून प्रसिद्ध चित्रकार सागर नेने यांनी विषयाला अनुरूप चित्रे व आकर्षक मुखपृष्ठ रेखाटले आहे. प्रसिद्ध बालसाहित्यिक सुरेश सावंत यांनी या पुस्तकाची पाठराखण केली आहे. प्रसिद्ध बाल साहित्यिक सचिन बेंडभर यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.