- अशोक चव्हाण यांचा रामराम ; १५ ते १६ आमदार पक्ष सोडणार ?
- आता निवडणूक आयोग अशोक चव्हाण यांना काँग्रेसचा ताबा देणार काय ? ; संजय राऊत यांचा सवाल
मुंबई I झुंज न्यूज : गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे बडे नेते मिलिंद देवरा, ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला रामराम केला असताना आता अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसमध्येही मोठा राजकीय भूकंप होण्याची चिन्ह असल्याचे म्हटले जात आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर चव्हाण यांचे निकटवर्तीय माजी आमदार अमर राजुकरांनीही काँग्रेस पक्ष सोडला आहे.
येत्या १५ फेब्रुवारी रोजी अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्याच दिवशी अमित शाह यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होण्याची सूत्रांची माहिती आहे. अमित शाह यांच्या १५ फेब्रुवारीच्या संभाजीनगरच्या सभेत प्रवेशाची शक्यता आहे. दरम्यान, ६ ते ७ आमदार चव्हाण यांच्या संपर्कात असल्याचीही चर्चा आहे. तर एकूण १५ ते १६ आमदार काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
आता निवडणूक आयोग अशोक चव्हाण यांना काँग्रेसचा ताबा देणार काय ? – संजय राऊत यांचा सवाल
काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या पक्षाचा राजीनामा दिला. आमदारकीचा राजीनामा अशोक चव्हाण यांनी दिल्यानंतर काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ उडाली. या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळातून सत्ताधारी विरोधकांकडून प्रतिक्रिया येत असताना अशोक चव्हाण भाजपवासी झाले, विश्वास बसत नाही, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. तर कालपर्यंत अशोक चव्हाण सोबत होते.. चर्चा करीत होते.. आज गेले…अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊत यांनी ट्वीट करत खोचक टोला लगावला आहे. तर पुढे ते असेही म्हणाले, एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्या प्रमाणे चव्हाण सुध्दा आता काँग्रेस वर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय? आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय? आपल्या देशात काहीही घडू शकते !, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.