बंजारा सेवा संघ मावळच्यावतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
पिंपरी I झुंज न्यूज : मावळ तालुक्यात बंजारा समाजाचा मोठा वर्ग राहत असूनही, समाजासाठी आतापर्यंत एकही समाजभवन नाही. बंजारा समाजातील नागरिकांच्यावतीने समाजभवनसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार, नगराध्यक्ष, आमदार सुनील शेळके, माजी मंत्री बाळा भेगडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
बंजारा सेवा संघ मावळच्यावतीने दरवर्षी 15 फेब्रुवारी रोजी संतगुरु सेवालाल महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यंदाही जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच बंजारा समाज मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे. देशभर संतगुरु सेवालाल महाराजांची जयंती साजरी करण्यात येते. त्यामुळे या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
वेगवेगळ्या भागांत राहात असलेला बंजारा समाज आज विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करीत आहे. समाजाचे सांस्कृतिक वैभव टिकून राहावे, तरुणांना एक व्यासपीठ मिळावे, रोजगार मेळावे घेता यावेत, विविध उपक्रम आयोजित करता यावेत, यासाठी हक्काच्या जागेवर समाजभवन बांधून मिळावे. संपूर्ण भारतात बंजारा समाजाची समान बोली, भाषा, पेहराव, आराध्य दैवतही एक तरीही वेगवेगळ्या राज्यात हा समाज वेगवेगळ्या प्रवर्गात का मोडतो ? त्यामुळे सर्व बंजारा समाजाचा सरसकट एसटी प्रवर्गात समावेश करावा. संत सेवालाल महाराजांच्या जयंतीदिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
या संदर्भात बंजारा सेवा संघाच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार, नगराध्यक्ष, यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी बंजारा सेवा संघ मावळ संस्थापक अध्यक्ष हिरा जाधव, तालुका अध्यक्ष महादेव राठोड, उपाध्यक्ष चंदु राठोड, सचिव नितीन चव्हान, खजिनदार राजू पवार, विठ्ठल राठोड, शंकर पवार, प्रताप शेट्टी चव्हाण, जयराम चव्हाण आदी उपस्थित होते.