पिंपरी I झुंज न्यूज : मराठा समाजाच्या हजामती करू नका म्हणत दोन समाजामध्ये सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांनी केली.अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काळे यांनी दिला आहे. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांना दिलेल्या निवेदनात काळे यांनी ही मागणी केली आहे.
सतीश काळे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मराठा समाज आपल्या आरक्षणासाठी संविधानिक मार्गाने लढा देत आहे. इतर समाजाला न दुखावता आरक्षणाचा हक्क मिळावा, यासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा करत आहे. असे असताना काही जण मराठा समाजाच्या विरोधात इतर समाजाच्या मनात द्वेष निर्माण करण्याचे काम करत आहे. महाराष्ट्र राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यामध्ये मोठी कळीची भूमिका बजावत आहे. नुकतेच त्यांनी अहमदनगर येथे ओबीसी भटके विमुक्त एल्गार सभेत मराठा समाजाच्या विषयी चुकीची वक्तव्य करत नाभिक समाज बांधवांना आवाहन केले की, मराठा समाज बांधवांची केस आणि दाढी करू नये. त्यांच्यावर बहिष्कार टाका.
बहिष्कार टाकण्याची भाषा करत दोन समाजामध्ये दुही पसरवून सामाजिक तेढ निर्माण केल्याबद्दल मंत्री छगन भुजबळ यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. तसेच राज्य सरकारने त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. मंत्री छगन भुजबळ हे समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी बांधवांसाठी काम करत असल्याचा दिखावा करत आहे.
“दोन समाजामध्ये भांडणे लावून कोणती समता भुजबळ आणत आहेत, हे आधी त्यांनी स्पष्ट करावे.भुजबळ यांच्या कोणत्याही प्रलोभनांना, भाषणांना आता ओबीसी बांधवांनी बळी पडू नये असेही आवाहन काळे यांनी केले आहे.तसेच समाजासमाजामध्ये द्वेष निर्माण केल्याबद्दल त्वरित मंत्री भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करावा.अन्यथा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल,असा इशारा काळे यांनी दिला.