– मराठा बांधवांनी विहीत नमुन्यात अर्ज दाखल करावेत ; आमदार महेश लांडगे यांचे आवाहन
पिंपरी I झुंज न्यूज : मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी झाला असून, महायुती सरकारच्या माध्यमातून मराठा बांधवांसाठी कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी भोसरी विधानसभा मतदार संघात महसूल विभागाच्या वतीने मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये सहभागी होत मराठा बांधवांनी विहीत अर्ज दाखल करावेत आणि कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे- पाटील यांनी केलेल्या आंदोलन आणि उपोषणामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने घेतला. महायुती सरकारच्या माध्यमातून कोणत्याही समाजाला न दुखावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेण्यात आली. त्यामुळे राज्यात कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत महसूल विभागाने मोहीम सुरू केली आहे.
भोसरी विधानसभा मतदार संघातील गावनिहाय सर्व्हेक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रासाठी कागदपत्रे सादर करण्याचे नियोजन महसूल विभागाने केले आहे. त्यामुळे अधिकाधिक मराठा बांधवांना आरक्षणाला लाभ घेण्यासाठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे…
अर्ज स्व. घोषणापत्र व फोटो, लाभार्थी व अर्जदार (वडील) यांचा शाळा सोडल्याचा दाखला, वडीलांचे जातप्रमाणपत्र असल्यास दोघांचे आधारकार्ड, आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला, सन १९६७ पूर्वींचे हवेलीतील कायमस्वरुपी वास्तव्याचे कुणबी जात नमूद महसुली पुरावे (सातबारा, कडईपत्र, वारस फेरफार गाव नमुना नं. १४ किंवा सन १९६७ पूर्वींचे हवेलीतील रक्तनाते संबंधातील कुणबी जात नमुद पुरावा जोडणे उदा. सख्खे/चुलत-चुलते आत्या, आजोबा, पणजोबा, खापरपणजोबा इ.), वंशावळ, मोडीलिपी असल्यास मोडीलिपी भाषांतर, नागरिक सुविधा केंद्रातील २ प्रतिज्ञापत्र, रहिवास पुरावा- चालू वीजदेयक (लाईटबील), शिधापत्रिका (रेशनकार्ड), जात पडताळणी (validity) प्रमाणपत्र अशी आवश्यक कागदपत्रांची यादी आहे.
मतदार संघातील शिबिराचे गावनिहाय वेळापत्रक :
मोशी : दि. ६ फेब्रुवारी २०२४ : सकाळी ११ वाजता. स्थळ : श्री. नागेश्वर मंदिर.
तळवडे : दि. ६ फेब्रुवारी २०२४ : दुपारी ३ ते सांयकाळी ५ पर्यंत. स्थळ : मारुती मंदिर, गावठाण.
चिखली : दि. ६ फेब्रुवारी २०२४ : संकाळी ११ ते दुपारी २ , स्थळ : गणेश मंदिर, बसस्टॉप.
डुडूळगाव : दि. ८ फेब्रुवारी २०२४, सकाळी ११ वा. स्थळ : श्री अडबंगनाथ मंदिर.
चऱ्होली : दि. ९ फेब्रुवारी २०२४, सकाळी ११ वाजता. स्थळ : तलाठी कार्यालय, गावठाण.
भोसरी : दि. ९ फेब्रुवारी २०२४, सकाळी ११ वाजता, स्थळ : तलाठी कार्यालय. तसेच, दि. ९ तारखेनंतरही इच्छुकांना तलाठी कार्यालयांमध्ये माहिती उपलब्ध होईल आणि अर्ज अप्पर तहसील कार्यालयात दाखल करता येणार आहेत.
“भोसरी विधानसभा मतदार संघात महसूल विभागाच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र वाटप मोहीम सुरू आहे. त्यासाठी अधिकाधिक मराठा बांधवांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आरक्षणाचा लाभ घ्यावा. गरजवंत मराठा समाजबांधवांना त्यामुळे शासनाच्या विविध योजना, सवलतींचाही फायदा होणार आहे.
– (महेश लांडगे, आमदार, भाजपा, )