सचिन बेंडभर व तुषार सिनलकर यांनी कथन केला ट्रेकिंगचा थरार
शिरूर । झुंज न्यूज : वाबळेवाडी शाळेचे माजी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांनी मिळून हरिश्चंद्रगडाच्या ट्रेकिंगचा चित्तथरारक अनुभव नुकताच घेतला. हरिश्चंद्रगड, कोकण कडा आणि तारामती पॉईंट पाहून झाल्यावर माघारी परतताना अगदी अर्ध्या तासाचा प्रवास राहिला असताना गडाच्या कपारीतील आगी मोहोळाच्या उठलेल्या माशांनी रस्ता अडवल्यानंतर निर्माण झालेला थरार तेथे उपस्थित असणाऱ्या युवा साहित्यिक सचिन बेंडभर व तुषार सिनलकर यांनी पत्रकारांशी बोलताना कथन केला.
हरिश्चंद्रगड पाहून झाल्यावर परतीचा प्रवास सुरू असताना ट्रेकर्सची दोन गटात विभागणी झाली. सर्व माजी विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन शिक्षक तुषार सिनलकर पुढे होते तर त्यांचे सहकारी सचिन बेंडभर हे पालकांसोबत होते. सरबत घेण्यासाठी थांबल्यानंतर त्यांच्यामध्ये बरेच अंतर पडले. जंगलात नेटवर्क नसल्याने एकमेकांशी संपर्क झाला नाही आणि सुरू झाला एक थरारक प्रवास!
त्यानंतर पुढे चालत असताना एका ठिकाणी त्यांना पर्यटकांची पळापळ जाणवली. चौकशी केली असता कपारीतील मोहोळ उठल्याचे त्यांना समजले. तेथील माशा कुणालाही जागच्या हालू देत नव्हत्या. त्यामुळे बरेच पर्यटक त्या ठिकाणी झोपून होते. तेव्हा तेथील स्थानिकांनी पायवाटेचा रस्ता धरून खाली उतरायला सुरुवात केली. कड्याच्या दुसऱ्या बाजूने असणाऱ्या स्थानिकांना जाताना पाहून हेही त्यांच्या मागे निघाले. आपली मुले खाली पोहचली असतील, या काळजीने ते त्यांच्या मागे चालू लागले. मात्र जंगलात ते लोक कुठे गायब झाले हे त्यांनाही समजले नाही. पालकांबरोबर चालत असताना ते ज्या ठिकाणी पोहचले त्या ठिकाणी रस्ता संपलेला होता. समोर दरी होती, त्यामुळे त्यांना पुन्हा मागे यावे लागले.
पुन्हा आहे त्या ठिकाणी जागेवर आल्यानंतर त्यांना डोक्याला कापड गुंडाळलेला एक प्रवासी पळत येताना दिसला. त्याच्या डोक्यावर आगी मोहोळाच्या माशा घोंगावत होत्या. काही माशांनी त्याला चावाही घेतला होता. तो येऊन त्याने सरळ पुढे असलेल्या पाण्यात त्याने उडी मारली. ते पाहून सर्वच प्रवाशांचा थरकाप उडाला आणि पुढे जाण्याचे साहस कोणाचेही झाले नाही.
काही वेळ थांबल्यानंतर पुन्हा अंदाज घेत ते पुढे निघाले. तेव्हा तिथे एक दहा पंधरा वर्षांचा स्थानिक मुलगा आला. त्यालाही माशांनी चावा घेतला होता. त्याचे बाबा त्याला समोर असणाऱ्या उंच कड्यावरून पायवाटेने न्यायला आले होते. तेव्हा बाकी पर्यटकांना आशेचा किरण सापडला. ते त्या मुलाच्या मागे चालू लागले. पलीकडच्या कड्यावर पोचल्यावर मोहिनी मांढरे या पालकांचे लक्ष समोरच्या कड्यावर गेले जेथून ते आले होते. तेथील वाटेने आपल्या मुलांना येताना पाहून त्यांचा तर थरकाप उडाला. त्या त्यांना आवाज देत होत्या. तिकडूनही मुलांचा प्रतिसाद येत होता. दोन्हींच्या मध्ये मोठी दरी असल्याने आवाज स्पष्ट कळत नव्हता. त्यांनी चालणाऱ्या स्थानिक वयस्कर बाबांना थांबण्याची विनंती केली. मुलांशिवाय आम्ही खाली उतरू शकत नाही हे स्पष्ट करताच त्यांनीही मदतीचे आश्वासन दिले. मग संतोष धुमाळ, पौर्णिमा धुमाळ आणि उषा राऊत हे मुलांना आणण्यासाठी पुन्हा माघारी गेले. ते येईपर्यंत सर्वजण जागीच बसून होते. परंतु जोपर्यंत मुले आली नव्हती तोपर्यंत जीवात जीव नव्हता. मुले येताच त्यांना सुखरूप पाहून हायसे वाटले.
मग सुरू झाला पुन्हा परतीचा प्रवास. इतर पर्यटकेही त्यांच्या मागे चालले होती. छोट्याशा पायी वाटेने अवघड वळणे असणारा तो प्रवास होता. नागमोडी वळणे आणि पाठीमागे भली मोठी रांग. चुकून एखादा दगड पडला तर खाली चालणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला लागण्याचा संभव होता. काही उतरण अशी होती की तिथे बसूनच सापासारखे सरपटत जावे लागत होते. स्थानिक एक दोघांनी सर्वांना उतरण्यासाठी अशा वाटांवर थांबून मदत केली. तर काही अनुभवी ट्रेकर्सनी सर्वांना खाली उतरण्यासाठी मदतीचा हात दिला. शेवटी तो अवघड कडा त्यांनी हिरकणीसारखा पार केला. तेव्हा सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
या ट्रिपचे आयोजक तुषार सिनलकर म्हणाले, बेंडभर सरांचा ग्रुप मागे राहिल्याने आम्ही त्यांची वाट पाहत त्याच कड्याजवळ थांबलो होतो. अचानक पुढून काहीजण धावत येताना दिसले. त्यातल्या स्थानिकांनी आम्हाला आगी मोहोळ उठल्याचे सांगितले. कुणीही जागचे हलू नका व तोंडावर पांघरून घ्या असं त्यांनी आम्हाला बजावलं. एवढं होऊनही मुलं घाबरली नव्हती. मी त्यांना सूचना देत होतो. त्यांनी त्या सूचनांचे काटेकोर पालन केले. त्यामुळेच आम्ही त्यातून सुखरूप बाहेर पडलो.
यातून ट्रेकर्सनी गडावर गेल्यानंतर कोणत्याही प्रकारचे आगाऊ धाडस करू नये. अवघड कड्यावर सेल्फीचा मोह आवरावा. निसर्गातील प्राणी पक्षांना विनाकारण इजा पोहोचू नये. गडावर मद्यपान करू नये. तसेच ज्या ठिकाणी आपण पर्यटनासाठी जात आहोत त्या ठिकाणची व्यवस्थित माहिती घ्यावी, म्हणजे प्रवासात त्रास होणार नाही अशी माहिती त्यांनी घेतलेल्या या अनुभवातून दिली.