सावित्रीमाई फुले यांना जिजाऊ ब्रिगेडचे अभिवादन
पिंपरी I झुंज न्यूज : ज्या काळात भारतीय स्त्रीयांना शिक्षण घेण्यास बंदी होती. त्या काळात महात्मा जोतिराव फुले यांनी पत्नी सावित्रीमाई यांना शिकवले. १८४८ ला पुणे येथे भिडे वाड्यात फुले पती, पत्नी यांनी भारतातील पहिली सार्वजनिक व मोफत शाळा महिलांसाठी सुरू केली. या शाळेच्या पहिल्या शिक्षिका सावित्रीमाई या होत्या. त्यांनी महिलांसाठी केलेले कार्य अमूल्य आहे हे भारतीय महिला कधीच विसरणार नाहीत. स्त्रीयांच्या बौद्धिक विकासात फुले दाम्पत्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे असे प्रतिपादन सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात जिजाऊ ब्रिगेड च्या जिल्हाध्यक्षा सुनिता शिंदे यांनी केले.
बुधवारी (दि.3 ) सावित्रीमाई फुले जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने महादेव काॅलनी, चिंचवडेनगर येथे करण्यात आले होते.
यावेळेस सावित्रीमाईच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सुनिता शिंदे म्हणाल्या की , त्या काळात विधवा विवाहास बंदी होती. स्त्री शिक्षणास बंदी होती. विधवांचे केशवपन केले जायचे. अंधश्रद्धा प्रचंड होती. या विरोधात सनातनी लोकांचा विरोध जुगारून फुले दाम्पत्याने स्त्रियांसाठी कार्य केले.
प्रास्ताविक जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा माणिक शिंदे यांनी केले. यावेळी माणिक शिंदे, शालन घाटूळ, आशा वायकुळे, निकिता त्र्यंबके, नयना वानखेडे, क्रांती चव्हाण, प्रणाली शिंदे, मोलंबा शेख आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शालन घाटूळ यांनी केले. आभार आशा वायकुळे यांनी मानले.