चिखली I झुंज न्यूज : चिखली मधील कुदळवाडी परिसरात गुरुवारी (दि. 28) पहाटे बिबट्या आढळला. लोकवस्तीमध्ये बिबट्या आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. अखेर पाच तासाच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास एक बिबट्या देहू-आळंदी मार्गावरील कुदळवाडी परिसरात आढळला. जनता गॅरेज रिक्षा संघटनेचे शिलेदाराला दीपक बंडे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी याबाबत पोलिसांना आणि वनविभागाला माहिती दिली. दरम्यान बिबट्या आढळल्याची माहिती परिसरात पसरली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सकाळी वन विभागाचे एक पथक कुदळवाडी येथे दाखल झाले. दरम्यान बिबट्याने काही घरांसमोर आणि गोठ्यात चांगलाच धुमाकूळ घातला. बिबट्याला बघण्यासाठी घाबरलेल्या नागरिकांनी गर्दी केली. वन विभागाकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या. तसेच बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. अखेर पाच तासाच्या प्रयत्नानंतर बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले आहे.