मुंबई I झुंज न्यूज : दिवाळी अंक हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित. दिवाळीतील फराळ, व फटाके दोन दिवसांत संपत असले तरी अंकांच्या निमित्ताने दिवाळीची आठवण वर्षभर ताजी राहते. ११४ वर्षाची मराठी भाषेची ही वैभवशाली “दिवाळी अंक” परंपरा मुंबईतील ‘मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई’ स्पर्धा आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून गेली ४८ वर्षे निरंतर जोपासत आली आहे. यावर्षी शुक्रवार, दिनांक २८ डिसेंबर रोजी आगरी सेवा संघाच्या सहकार्याने सदानंद वाडी, प्रभादेवी येथील त्यांच्या हॉलमध्ये संध्याकाळी ७ वा कार्यक्रम होत आहे.
दादर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप भागडीकर यांच्या हस्ते उद्घाटन तर मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी शिवराजाभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त शिवपूर्वकाल ते शिवराजाभिषेक या विषयावर चतुरंग सन्मान पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ इतिहास संशोधक दुर्गमहर्षी आप्पा परब यांचे व्याख्यान होणार आहे. ७ जानेवारीला ठाणे पूर्व येथे स्वराज सामाजिक सेवा संघाच्या वतीने तर जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात इंदूर येथील १०९ वर्षाची “महाराष्ट्र साहित्य सभा” आणि जानेवारीच्या चौथ्या आठवड्यात अमेरिकेतील लॉस एन्जेलिस येथे मराठी कल्चरल अँड फेस्टिव्हल marathicultureandfestivals.com या संस्थाच्या वतीने प्रदर्शने होत आहेत.
संस्थेच्या वतीने १९७६ पासून ही स्पर्धा विनामूल्य घेतली जाते. या मान्यताप्राप्त आणि लोकप्रिय स्पर्धेसाठी नेहमीप्रमाणे महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही सर्वाधिक अंक येत असतात. स्पर्धेसाठी निकाल १५ फेब्रुवारीला घोषित करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी आलेल्या दिवाळी अंकांना – सर्वोत्कृष्ट अंकासाठी मनोरंजनकार का र मित्र स्मृती पुरस्कारासह उत्कृष्ट आणि उल्लेखनीय अंक म्हणून स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या अंकांचा पारितोषिक देऊन मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारी रोजी मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात येते. निकालानंतर मराठी भाषेचा जागर करण्यासाठी यावर्षी हे अंक इंदूर, ग्वाल्हेर आणि अमेरिकेतील मराठी बांधवांना विनामूल्य देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे ९३२३११७७०४ संपर्क साधावा असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी केले आहे.