पिंपरी मध्ये कर्करोगग्रस्त रुग्णांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार वाजवी दरात मिळणार
पिंपरी I झुंज न्यूज : लवकर निदान झाले तर कॅन्सर शंभर टक्के बरा होतो, तसेच प्रत्येकाने आहार विहार पद्धतीत दारू, तंबाखू सारख्या व्यसनांपासून दूर रहावे, तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळावेत आणि नियमित व्यायाम करावा या त्रीसुत्रीचा अवलंब करून कॅन्सर पासून दूर राहता येईल असे प्रतिपादन एमओसी पिंपरी सेंटरचे वरिष्ठ कर्करोग तज्ञ डॉ. रविकुमार वाटेगावकर यांनी केले.
पिंपरी येथे रविवार (दि.२६) पासून सुरू होणाऱ्या एमओसीचे (मुंबई ओंको सेंटर) उद्घाटन जागतिक कर्करोग तज्ञ डॉ. भरत पारेख यांच्या हस्ते होणार आहे. याची माहितीसाठी देण्यासाठी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. वाटेगावकर बोलत होते. यावेळी डॉ. रितू दवे उपस्थित होत्या.
यावेळी डॉ. वाटेगावकर यांनी सांगितले की, पिंपरी मध्ये कर्करोगग्रस्त रुग्णांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार वाजवी दरात एमओसी मध्ये मिळणार आहेत. गेल्या पाच वर्षात नावारूपाला आलेली ही संस्था आहे. एमओसीचे महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये १४ कॅन्सर केअर सेंटर आणि ४ कॅन्सर क्लिनिक्स उपलब्ध आहेत. वर्ष २०२१ मध्ये एमओसीने मॉडेल कॉलनी, पुणे येथे जिल्ह्यातील पहिले कॅन्सर केंद्र सुरू केले. उदात्त हेतू, उपचार कौशल्य आणि तंत्रज्ञान यांचा सुरेख मेळ साधता आल्यामुळे एमओसीने गेल्या पाच वर्षात पुण्यासह महाराष्ट्रात सुमारे १,२५,००० हून अधिक कर्करोगग्रस्तांना उपचार दिले आहेत.
आता पिंपरी चिंचवड येथे पुणे जिल्ह्यातील दुसरे कॅन्सर केअर केंद्र पिंपरी मेट्रो स्टेशन लगत गेरास इम्पेरियल ओएसिस येथे अध्ययावत सुविधांनी परिपूर्ण असे सुरू होत आहे. या ठिकाणी रुग्णांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार, वाजवी दरात घेता येतील. उपचार घेत असताना येणारा आर्थिक भार कमीत कमी करावा असे एमओसी केंद्राचे ध्येय आहे. कर्करोगास प्रतिबंध कसा करावा तसेच कर्करोगाचे लवकर निदान आणि उपचारांच्या दृष्टीने त्याचे महत्त्व यासंबंधी जनजागृती करण्यासाठी देखील एमओसी पिंपरी सेंटर प्रयत्नशील राहील असेही डॉ. वाटेगावकर यांनी सांगितले.
लहान मुलांमध्ये होणारे कॅन्सर ८० ते ९० टक्के बरे होतात. कॅन्सरचे निदान होणे हे रुग्णांसाठी एकदम धक्कादायक असते, त्यासाठी तज्ञ डॉक्टरांकडून उपचार व समुपदेशक तज्ञांकडून सल्ला घ्यावा. स्त्रीयांनी वयाच्या ३५ नंतर भीती न बाळगता गर्भाशयाची (Paps smear) आणि ४० नंतर स्तन (मॅमोग्राफी) तपासणी करावी असे आवाहन डॉ. रितू दवे यांनी केले.