– कृषी गोसेवा संघाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांचे आवाहन
– मोशीत देशातील सर्वात मोठे देशी गोवंश-अश्व पशू प्रदर्शन
पिंपरी I झुंज न्यूज : भारत हा महाशक्ती झाला पाहिजे, असे म्हटले जाते. त्यासाठी गोशक्ती सक्षम झाली पाहिजे. भारत जेव्हा स्वतंत्र झाला. गायीच्या गोमूत्राला जुनागड विद्यापीठाने ‘लिक्विड गोल्ड’ असे नाव दिले. गायीचे शेणसुद्धा मौलवान आहे. ‘‘गायीचे रक्षण केलीयाचे पुण्य बहूत आहे…’’ असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वचन आहे. असे असतानाही महाराष्ट्रात गोहत्या केली जाते, ही बाब चिंताजनक आहे. त्यामुळे आमदार महेश लांडगे आणि सहकाऱ्यांनी ‘‘गोहत्यामुक्त महाराष्ट्र’’ निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी केले.
अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे, शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे पुणे जिल्हा प्रमुख संजय जठार, विधान परिषदेचे आमदार गोपिचंद पडळकर यांच्याहस्ते मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या मैदानावर देशी गोवंश व अश्व पशू प्रदर्शन व आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी माजी महापौर राहुल जाधव, माजी पशूसंवर्धन आयुक्त विश्वास भोसले, पशू संवर्धन विभागाचे सहआयुक्त, पुणे डॉ. संतोष पंचभोर, जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकूश परिहार, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे संदीप बोदगे, अण्णासाहेब मगर बँकेचे चेअरमन नंदू लांडे, माजी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार गोपिचंद पडळकर म्हणाले की, आमदार महेश लांडगे यांचे व्यक्तीमत्व बहुआयामी आहे. हिंदूप्रेमी, बैलागाडा प्रेमी, गोप्रेमी, कुस्तीप्रेमी असे अनेक पैलू त्यांचे आहेत. त्यांचा हिंदूत्ववादी चेहरा दिवसेंदिवस उजळतो आहे. अत्यंत धाडसाने ते भूमिका घेतात. त्याचे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात स्वागत होते. देशी गोवंश व अश्व प्रदर्शन हे गोवंश वाचवण्याच्या चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान देणार आहे.
गोवंश व पशूंसाठी ‘रॅम्पवॉक’…
महाराष्ट्रभरातून तसेच देशातील विविध राज्यातून साडेपाचशेहून अधिक शेतकरी व गोवंशपालक उपस्थित होते. या पशुप्रदर्शनामध्ये खिल्लार, देवणी, लालकंधारी, थारपारकर, म्हैस, रेडा, कांकरेंज, गीर, डांगी, साहिवाल, पुंगनूर, मालनाड गिड्डा, कपिला गाय बैल तसेच मारवाडी व भीमथडी अश्व मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे क्रमांक काढण्यात येणार आहेत. पहिल्या क्रमांकाच्या गोवंश आणि पशूंचे ‘रॅम्प वॉक’ होणार आहे, असा प्रयत्न भारतात प्रथमच होत आहे.
आमदार लांडगे यांना ‘हिंदूत्व शौर्य’ पुरस्कार…
आमदार लांडगे यांनी गोसंवर्धन आणि प्रखर हिंदूत्त्वाची भूमिका घेतली आहे. हिंदूत्वाच्या मुद्यावर विधानसभा आणि सार्वजनिक जीवनात त्यांची आक्रमक भूमिका महाराष्ट्रातील हिंदूत्त्ववादी कार्यकर्ते, नागरिकांसाठी प्रेरणा देणारी आहे. त्यामुळे यावर्षीचा ‘हिंदूत्व शौर्य’ पुरस्कार त्यांना जाहीर करतो, अशी घोषणा यावेळी अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद एकबोटे यांनी केली. डिसेबर- २०२३ मध्ये पुण्यात हिंदूत्त्ववादी संघटना, संत-महात्मे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमामध्ये आमदार लांडगे यांना हा पुरस्कार व सोन्याचे कडे देवून गौरविण्यात येईल, असेही डॉ. मिलिंद एकबोटे यांनी सांगितले.