अंगात जिद्द आणि चिकाटी असेल तर यश नक्की मिळते – पै.सिकंदर शेख
क्रीडा क्षेत्रात नाव उंचावण्यासाठी सतत प्रयत्नशील रहा – राजेंद्र बांदल
मुळशी I झुंज न्यूज : वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र केसरी झालो. मोठे स्वप्न उराशी बाळगून विद्यार्थ्यांनी जीवनात आगेकूच करावी. अंगात जिद्द आणि चिकाटी असेल तर यश नक्की मिळते असे मत महाराष्ट्र केसरी पै.सिकंदर शेख यांनी पेरिविंकल स्कूल बावधन येथे व्यक्त केले.
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल बावधन पुणे येथे क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन चपळ चिता म्हणून देशभर प्रसिद्ध असलेला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.राजेंद्र बांदल यांनी रोख रक्कम 51 हजार व मानचिन्ह देऊन महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांचा सन्मान केला. यावेळी संस्थेने सत्कार केल्याबद्दल संस्थेचे तसेच अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल यांचे शेख यांनी आभार मानले.
त्यावेळी सदाशिव घुले, बाळासाहेब खाटेर,शरद पवार,योगेश सोनवणे, प्रदीप साठे, दीपक कंधारे संचालिका रेखा बांदल, ज्यु.संचालक यश बांदल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी अभ्यासात नियोजन आणि सातत्य ठेवले पाहिजे असे आवाहन करत सभापती भानुदास पानसरे यांनी शाळेच्या शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच क्रीडा क्षेत्रात नाव उंचावण्यासाठी सतत प्रयत्नशील रहा असा सल्ला संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी विविध खेळात प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंच्या हस्ते मैदानावर क्रीडा ज्योत फिरविण्यात आली. प्रत्येक खेळामध्ये विद्यार्थ्यानी हिरीरीने सहभागी होत आपल्यातील क्रीडा कौशल्यांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.प्रत्येक खेळात विद्यार्थ्यांनी वचनबद्धता आणि प्रतिबद्धता दर्शविण्यासाठी शपथ घेतली. माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यानी ऍरोबिक्स हे संगीत नृत्यासह आणि नाट्यपूर्ण रचनेने लयबद्ध हालचाल करून परेड केली. नर्सरीपासून ते बारावीच्या विद्यार्थ्यांकरीता विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. पूर्व-प्राथमिक विभागात चमचा-लिम्बू, कलेक्टिंग फ्रूट, २० मीटर रेस, हॅन्ड बॉल थ्रो, बुक बॅलन्सिंग इत्यादी क्रीडा स्पर्धा बालगोपालांसाठी घेण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक स्वाती कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक इंदू पाटील तसेच पर्यवेक्षिका रश्मी पाथरकर, कल्याणी शेळके, रश्मी बेलोकर यांनी केले व सूत्रसंचालन ऋचा हल्लूर यांनी केले.