निमगाव म्हाळुंगी ग्रामस्थांकडून कौतुक ; आकाश भोरडे भावनिक
शिरूर I झुंज न्यूज : शिरूर तालुक्यातील युवा साहित्यिक आकाश हरिभाऊ भोरडे यांचा लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. नुकताच बालगंधर्व रंगमंदिर पुणे या ठिकाणी हा पार पडला. हा पुरस्कार मिळणे गावासाठी अभिमानाची गोस्ट असल्याने आकाश भोरडे यांचा निमगाव म्हाळुंगी ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला.
या सत्काराला उत्तर देताना व आभार व्यक्त करताना आकाश भोरडे म्हणाले कि, काल नुकताच लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा महाराष्ट्र रत्न पुरस्कार बालगंधर्व रंगमंदिर पुणे या ठिकाणी पार पडला. खरंतर या पुरस्कारापेक्षाही दोन दिवसांपूर्वी माझ्या गावातील निमगाव म्हाळुंगी ग्रामस्थांनी केलेला सन्मान मला कैक पटीने अधिक मोठा वाटला. मला बोलावून माझा गावामध्ये सन्मान केल्याबद्दल नवनिर्वाचित सरपंच बापूसाहेब काळे, उपसरपंच अश्विनीताई लांडगे, ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थांचे प्रथमतः मनःपूर्वक आभार.
दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या सन्माना बरोबरच दीपावली निमित्त लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकार बांधवांचा व ग्रामपंचायत सेवकांचा मिठाईचे वाटप करून सन्मान करण्यात आला. नक्कीच हे कौतुकास्पद आहे. परंतु काही उणिवा जाणवल्या त्या आपणापुढे मांडत आहे.
सन्मान सोहळा हा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आला होता. तसेच निमंत्रण देतेवेळी ‘ग्रामपंचायत निमगाव म्हाळुंगीच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा’ असे निमंत्रण देण्यात आले होते. परंतु ज्या वेळेस परिसरातील लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारे पत्रकार बांधव आपल्या गावामध्ये येतात व ग्रामपंचायत कार्यालयामध्ये त्यांचा सन्मान सोहळा होतो. त्यावेळेस ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी उपस्थित असणे गरजेचे होते. परंतु फक्त नवनिर्वाचित सरपंच आणि एक ग्रामपंचायत सदस्य वगळता उपसरपंच व इतर ग्रामपंचायत सदस्यांची अनुपस्थिती जाणवली. काही तांत्रिक अडचणी मुळे उपसरपंच यांचे पती त्या ठिकाणी हजर होते. परंतु कायद्याची चौकट आड येत असल्याने ते उपस्थितांमध्ये बसले होते. नंतर माझ्या सर्व पत्रकार सहकाऱ्यांच्या विनंतीनुसार ते सरपंच यांच्या बाजूला बसले.
सर्व सदस्य ग्रामपंचायत सदस्य अनुपस्थित असण्याचे कारण विचारले असता ग्रामपंचायत सदस्य या जास्तीत जास्त महिला असल्याने व दीपावली निमित्त घरगुती कामात व्यस्त असल्याने त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत असे सांगण्यात आले. खरंतर ग्रामपंचायतमध्ये जास्तीत जास्त महिला सदस्या असणे हे देखील कौतुकाची गोष्ट आहे. निवडणूक लढते वेळी कायद्याची चौकटीमुळे किंवा आरक्षणाच्या प्रश्नामुळे आपण स्वतःची इच्छा असताना देखील नाईलाजाने आपल्या घरातील स्त्रीला त्या पदाचा सन्मान देतो व निवडून आल्यानंतर आयुष्यभर पुरुषप्रधान संस्कृतीचा गवगवा करत स्रियांना मिळालेले पद हे आपण स्वतःच्या नावावर खपवत असतो व ते पद मिरवत असतो. त्यामुळे उपसरपंच यांचे पती जसे उपस्थित राहिले तसे इतर सदस्यांचे देखील प्रतिनिधी उपस्थित राहू शकले असते.
गावचा विकास करत असताना किंवा गाव पातळीवर राजकारण करत असताना आपापसात राजकीय हेवेदावे, मतभेद जरूर असतील परंतु ते इतरांना कळता कामा नये याची दक्षता आपण घ्यायला हवी. संसार करत असताना घरात कलह जरूर असावा परंतु त्याचा आवाज मात्र शेजारी जाणारा नसावा, माणसा माणसांत मतभेद असावेत परंतु मनभेद मात्र असू नयेत.
दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेस आमचा एक पत्रकार सहकारी आपल्या मनोगतातून निमगाव म्हाळुंगीचा इतिहास मांडत असतो. त्यावेळेस इतिहासातील बापू गोखले यांची आठवण करून देतो. आणि इतर सर्वांना ते जाणून घेण्याची इच्छा होते. खरंतर माझं साहित्याचा अंग असल्याने वाचन करत असताना कुठेतरी इतिहासाची पाने चाळताना माहिती सापडते शिरूर तालुक्याच्या इतिहासाची. त्यामध्ये करडे गावच्या शेतसारा बंदीची, रांजणगावच्या बैल दत्तक योजनेची, धामारीत वासुदेव बळवंत फडकेंनी टाकलेल्या पहिल्या दरोड्याची, इनामगावच्या उत्खननाची, आलेगाव पागा येथील घोड्यांच्या निवासस्थानाची, पाबळच्या मस्तानीच्या कबरीची, वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीची, शिरूरच्या विभावरी ताई शिरूरकर यांच्या लेखणीची, कवठ्याच्या बि.के.मोमीन कवठेकरांची, केशवपणाची चाल बंद व्हावी म्हणून पुकारलेल्या तळेगावातील न्हावांच्या संपाची, ज्योतिबा फुलेंनी बांधलेल्या सरदार जयसिंगराव ढमढेरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची आणि हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांची. येथेच माहिती सापडते फक्त एका ओळीची ती माझ्या निमगाव म्हाळुंगीची. आणि ती ओळ अशी होती ”गोखले यांच्या वाड्याची फक्त आता वेस शिल्लक असून गावकऱ्यांनी व परिसरातील नागरिकांनी केवळ पांढऱ्या मातीसाठी संपूर्ण तटबंदीची वाट लावली आहे.”
ही ओळ वाचल्यानंतर वाचनाचा वाढणारा वेग क्षणभर मंदावत गेला. आणि खरंच आपल्या गावातील एक इतिहासाची नोंद आपण किती विसरून चाललो आहोत ना असा प्रश्न पडला. लहानपणी ऐकले होते की पांढरी माती निमगावला भेटते परंतु ती माती विकत भेटत असावी असा माझा समज होता. परंतु ती माती विकत नव्हे तर एका इतिहासातील तटबंदीची काढून आणावी लागत होती हे मला तेव्हा समजले.
सन्मान सोहळा पार पडल्यानंतर वाजत गाजत मिरवणूक ग्रामदैवत म्हसोबा महाराज देवाच्या मंदिरापाशी आली. त्याच वेळेस कौतुक झालं ते म्हसोबा देवाच्या बांधलेल्या मंदिराचे, समोरच ज्या वास्तूला नुकतेच 49 वर्षे पूर्ण झाली त्या ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवणाऱ्या म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्या विकास मंदिर विद्यालयाचे, शेजारीच असणाऱ्या हनुमान, महादेव मंदिर व सभामंडपाचे, सैनिक भवन आणि नुकतेच उदघाटन सोहळा पार पडलेल्या वास्तुचे.
शेवटी घराकडे वळत असताना सोबत असणाऱ्या पत्रकार सहकाऱ्यांना काट्याकुट्यांनी गडप झालेली वेस आणि ढासळलेली तटबंदी दाखवताना क्षणभर हात थरथरत होते. ज्या गावाला एक इतिहास आहे ज्या गावात निवडणुकीमध्ये कोट्यावधी रुपयाची उधळण होते. त्या माझ्या निमगाव म्हाळुंगी गावच्या इतिहासातील ऐतिहासिक वास्तूंचे काय हा प्रश्न निर्माण होतो… अशा भावनिक शब्दात अक्ष भोरडे यांनी आपले मत व्यक्त केले.