सत्यशोधक परिषदेस उपस्थित राहण्याचे संभाजी ब्रिगेडचे आवाहन
पुणे I झुंज न्यूज : महात्मा फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या चळवळीला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांचा सामाजिक कार्याचा वारसा जपण्याच्या उद्देशाने पुण्यात ऐतिहासिक सत्यशोधक संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनात सहभागी होऊन महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचे साक्षीदार व्हा, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केले.
पुण्यात रविवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता पुण्यातील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या मैदानात सत्यशोधक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.संभाजी ब्रिगेड,भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने यासाठी पुढाकार घेतला आहे.त्याच्या नियोजनासाठी थेरगाव येथील जिजाऊ सभागृहात संभाजी ब्रिगेडची बैठक पार पडली.या वेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
या वेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अशोक काकडे, जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते, शहराध्यक्ष सतीश काळे,जिल्हा सचिव गणेश कुंजीर,पुणे शहराध्यक्ष प्रशांत कुंजीर, कार्याध्यक्ष सुनील भाडाळे, उपाध्यक्ष वैभव जाधव,संघटक संजयसिंह शिरोळे,सहसचिव कैलास कणसे,प्रथमेश पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार शरद पवार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्धाटन होणार आहे. या वेळी इतिहास संशोधक प्राध्यापक मा.म.देशमुख,हमाल पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव,भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.तसेच आमदार रोहित पवार,बामसेफचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व्ही.व्ही.जाधव, आयपीएल राज्य पदाधिकारी ऍड.वासंती नलावडे,बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक विठ्ठल सातव,प्राध्यापक डॉक्टर जे.के.पवार प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
सत्यशोधक समाज स्थापनेमागील उद्देश,विचारधारा व आजची प्रासंगिकता यासह सत्यशोधक समाजाचे पुनर्जीवन करणे हीच व्यवस्था परिवर्तनाची पुर्वशर्त होय या दोन विषयांवर चर्चासत्र होणार आहे.
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी 24 सप्टेंबर 1873 या दिवशी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती.बहुजन समाजाला धार्मिक,सामाजिक, शैक्षणिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी हा सत्यशोधक समाज स्थापन केला होता.महात्मा फुलेंनंतर सावित्रीबाई फुले,मुक्ता साळवे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भास्करराव जाधव,भाई माधवराव बागल,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर इत्यादि अनेकांनी हे वैचारिक आंदोलन पुढे सुरु ठेवले होते. सध्या देशात असत्याचा मार्ग अवलंबून राजकीय,सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न वारंवार केले जात आहेत.सत्य मांडणाऱ्या लोकांवर सूडबुद्धीने कारवाया केल्या जात आहेत. फॅसिस्ट शक्तींना रोखण्यासाठी सत्यशोधक आंदोलनाची प्रासंगिकता राष्ट्रीय पातळीवर आहे.या पार्श्वभूमीवर सत्यशोधक समाज स्थापनेला 150 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सत्यशोधक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.शिवाय फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील अनुयायांना या संमेलनासाठी आम्ही निमंत्रित करत असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
संभाजी ब्रिगेड,भारत मुक्ती मोर्चा, छत्रपती क्रांती सेना,बहुजन क्रांती मोर्चा,राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा,मौर्य क्रांती संघ,राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ,राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद,राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा,लहुजी क्रांती मोर्चा,राष्ट्रीय किसान मोर्चा आदी संघटना या मध्ये सहभागी होणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी दिली.