हिंजवडी I झुंज न्यूज : आयटीनगरी हिंजवडी येथे स्थानिक युवकांच्या पुढाकारातून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सलग चार महिने कडकडीत लॉकडाऊन करण्यात आल्याने शहर आणि उपनरात रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे आयटीनगरीतील युवकांनी शुभम साखरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हिंजवडी गावठाण येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी शिबीरास भरभरून प्रतिसाद दिला. पुणे येथील ओम ब्लड बँक यांच्या सहकार्याने तसेच युवासेनेचे पदाधिकारी तसेच हिंजवडीतील स्थानिक रहिवासी शुभम श्रीरंग साखरे यांच्या नेतृत्वाखाली ह्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी युवासेनेचे पुणे जिल्हाधिकारी अविनाश बलकवडे, मुळशीचे सुर्यकांत साखरे, हवेलीचे संतोष शेलार तसेच संतोष तोंडे, हिंजवडी ग्रामपंचायतचे माजी सदस्य मल्हारी साखरे, नागेश साखरे, हभप शेखर महाराज जांभुळकर, कैलास साखरे, अजित साखरे आणि युवा सैनिक उपस्थित होते.
“दरवर्षी वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. सार्वजनिक मंडळे, संस्था आणि संघटनांनी पुढे येऊन रक्तदान शिबीरे आयोजित करणे आवश्यक आहे या प्रशासनाने केलेल्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत युवकांनी यंदा सुद्धा सामाजिक बांधीलकी जपत, सोशल डिस्टन्सिंग तसेच इतर सर्व खबरदारी घेऊनच रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते असे युवासेनेचे शुभम साखरे यांनी सांगितले.”