“चहा, पाणी, नाश्ता फुकट द्या” अशी मागणी कोकणातील एकाही व्यक्तीनं केली नव्हती..केली नाही.. तरीही रवींद्र चव्हाण साहेबांनी रायगड जिल्ह्यात प्रत्येक पंधरा किलो मिटरला एक “सुविधा केंद्र” सुरू करून कोकणात जाणारया चाकरमान्यांना अगदी फुक्कट चहा, पाण्याची, नाश्त्याची व्यवस्था केलीय.. जेथे हे फुकट मिळणार आहे, त्याचं नामकरण “सुविधा केंद्र” असं करण्यात आलंय.. कोकणी जनतेचं मुळ विषयाकडून लक्ष अन्यत्र वेधण्याचा हा अत्यंत बालिश प्रयत्नय.. .. जनतेला गप्प करण्यासाठी त्यांच्या हाती सुविधांचं चॉकलेट देण्याची कोशिश सरकारनं केलीय..यापुर्वी कोणत्याही वर्षी गणेशभक्तांसाठी अशी फुकटछाप सुविधा केंद्र उभारली गेली नव्हती..
कोकणी जनतेची मागणी काय ? मुंबई – गोवा महामार्ग लवकर सुरू करावा ही.. सतरा वर्षे कोकणी जनता ती करतेय.. सरकार ती पूर्ण करीत नाही.. सरकारनं काही दिवसांपुर्वी राणा भीमदेवी थाटात घोषणा केली.. “गणपतीपुर्वी एक लेन सुरू करणारच” .. झाली का? नाहीच.. ती होणारही नव्हती.. जे काम 17 वर्षात झालं नव्हतं ते दोन महिन्यात कसं होणार होतं? यावर रवींद्र चव्हाण काय म्हणताहेत बघा.. “पनवेल ते कासू दरम्यान ४२ किलो मिटरची एक लेन पूर्ण झाली आहे.. पण काही स्पॉट अजून खराब आहेत” याचा अर्थ एवढाच की, अजून एक लेन परीपूर्ण झाली नाही.. “कासू ते इंदापूर हा रस्ता तीन – चार दिवसात पूर्ण होईल” असं मंत्री सांगतात म्हणजे हा भागही पूर्ण झालेला नाही..
याचा अर्थ चाकरमानी मंडळी कोकणात जायला निघाली तरी सरकार आपलं वचन पूर्ण करू शकलं नाही.. म्हणून आता “खालापूर, पाली, वाकण मार्गे प्रवास करा” असं सरकार सांगतंय.. एक लेन पूर्ण नाही, ठिकठिकाणी कामं सुरू आहेत.. परिणामतः वाहतूक कोंडी अटळ आहे.. त्यातून संताप, उद्रेक होणार.. हे मुंबईच्या पत्रकारांना घेऊन पाच वेळा महामार्गाची पाहणी केलेल्या मंत्री रवींद्र चव्हाण यांना नक्की माहिती आहे.. यावर उतारा काय? तर सुविधा केंद्र.. या केंद्रावर बालक आहार, महिला फिडिंग केंद्र, पोलीस मदत केंद्राबरोबरच फुकट चहा, पाणी, बिस्कीटची व्यवस्था केली गेली आहे..
वाहतूक कोंडी आणि खड्डे युक्त रस्त्यानं कोकणी माणसाची हाडं खिळखिळी झाली की, दर पंधरा मिनिटाला मोफत चहा पान दिले जाणार आहे.. यावरची एका कोकणी मिश्कील माणसाची प्रतिक्रिया फार मार्मिक होती.. तो म्हणाला, “सुविधा केंद्रात मोफत चहा, नाश्तयाबरोबरच मोफत मसाज केंद्र सुरू केले तर खराब रस्त्यामुळे जेव्हा हाडं खिळखिळी होतील तेव्हा त्याला मसाज मिळाला तर आराम मिळेल..खरंच याचा विचार व्हायला हरकत नाही..
मुद्दा रस्त्याचा असताना रवींद्र चव्हाण सुविधा केंद्रावरच बोलत असतात .. ते किती उपयुक्त ठरणार वगैरे.. त्यांच्या बोलण्याचा अर्थ एवढाच की, गणपतीपुर्वी एक लेन पूर्ण होत नाही.. त्यामुळे कोकणात जाणारया गणेशभक्तांनी त्रास होणारच याची मानसिक तयारी करूनच मुंबई – गोवा महामार्गावर उतरावे..