पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरात व्यावसायिक ठिकाणी तसेच दुकानात राहणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. त्यांना व्यावसायिक ठिकाणी अकस्मात होणाऱ्या अपघातांपासून बचाव करता यावे, तसेच त्यांना राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था करता यावी, यासाठी अशा लोकांचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात गव्हाणे यांनी शहरात वरचेवर व्यावसायिक ठिकाणी राहत असणाऱ्या लोकांबाबत घडत असलेल्या अपघातांचा आढावा घेतला आहे. अशा धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे त्यांचे सर्व्हेक्षण करणे गरजेचे आहे, असे गव्हाणे म्हणाले.
ते म्हणाले की, ‘शहरातील पूर्णानगर, चिंचवड येथील सचिन हार्डवेअर अँड इलेक्ट्रिकल्स दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यापूर्वीही २३ फेब्रुवारी २०२१ मध्ये आकुर्डी प्राधिकरण येथील म्हाळसकांत चौकाजवळ जयहिंद चौकात घरातच बनवलेल्या सारडा क्लॉथ सेंटर या कपड्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. पुणे शहरातही यापूर्वी असेच कपड्याच्या दुकानात लागलेल्या आगीमध्ये कामगारांचा मृत्यू झाल्याचे घटना घडली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील दुकानात अथवा व्यायसायिक ठिकाणीच राहणाऱ्या कुटुंबाचे सर्व्हेक्षण करून पुढील उपाययोजना तातडीने लागू करायला हवेत.’
आपल्या निवेदनात गव्हाणे पुढे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी १८ फूट वा त्याहून अधिक उंचीचे गाळे बांधण्यात आल्याचे दिसतात. अशावेळी बाहेरील राज्यातून आलेली अनेक कुटुंबे या दोन मजली दुकानांमध्येच वरती पोटमाळा बनवून त्यामध्ये घरगुती वापरासाठी किंवा राहण्यासाठी उपयोग करतात. दुकानांमध्ये जास्तीचा वेळ देता यावा आणि राहण्यासाठी वेगळे भाडे जाऊ नये यासाठी काटकसर म्हणून ते पोटमाळ्याचा उपयोग राहण्यासाठी करतात. मात्र, आपत्तकालीन परिस्थितीमध्ये आग लागून अथवा अन्य अपघाताने नागरिकांच्या जीवास धोका होताना दिसत आहे.
यासाठी महापालिकेने बांधकाम परवाना विभाग, करसंकलन विभाग तसेच संबंधित इतर विभागांशी समन्वय साधून पिंपरी चिंचवड शहरातील व्यावसायिक जागेत राहणाऱ्या नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत व पुढील उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गव्हाणे यांनी केली.