पुणे I झुंज न्यूज : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय घेतला होता. त्यानंतर मराठा समाजास आरक्षण मिळण्यासाठी समाजाने अनेक आंदोलने केली. परंतु सरकारकडून ठोस निर्णय झाला नाही. न्यायालयीन प्रक्रियेत हा निर्णय अडकणार असल्यामुळे मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आतच ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी सतत होत आहे. या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. त्यासाठी आंदोलन उभारण्यात येणार आहे. यामुळे पोलिसांनी मराठा समन्वयकांना नोटिसा दिल्या आहे.
मराठा आरक्षणासाठी सरकारकडून कोणताही ठोस निर्णय अद्याप झाला नाही. यामुळे मराठा समाजाने 29 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पोलिसांनी मराठा समन्वयकांना नोटिसा दिल्या आहेत. वर्षा बंगला परिसरात आंदोलन करू नका, अशा नोटिसा मराठा समन्वयकांना मुंबई पोलिसांकडून दिल्या आहेत.
मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. ओबीसीच्या कोट्यातून हे आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. तसेच जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत नोकरभरणी करू नका, अशी मागणी मराठा समन्वयकांनी केली आहे. त्यासाठी 29 ऑगस्टला वर्षा बंगल्याबाहेर आंदोलन करणार आहे.
मराठा समाजाच्या इतर मागण्या
राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रलंबित असलेला प्रश्न तात्काळ सोडवावा, अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम तात्काळ सुरू करावे, पंजाबराव देशमुख निर्वाण भत्ता आणि वस्तीगृह योजनेचा लाभ सर्वच मराठा विद्यार्थ्यांना मिळावा, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून मराठा समाजातील उमेदवारांना कर्ज दिले जाते, परंतु त्यासाठी अनेक जाचक अटी आहेत, त्या अटी रद्द कराव्यात, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना झालेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करावी तसेच मराठा आरक्षणाच्या आंदोलकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घ्यावे, या मागण्या मराठा समाजाच्या आहेत. यासाठी समाजाकडून राज्यात अनेक वेळा आंदोलन, उपोषण करण्यात आले आहे.