पिंपरी । झुंज न्यूज : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला जोडणाऱ्या मुंबई – पुणे महामार्गावरील दापोडी येथे मुळा नदीवरील अस्तित्वात असलेल्या जुन्या हॅरिस पुलाचा लोकार्पण सोहळा आज महापौर उषा उर्फ माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष अण्णा लोंढे यांच्या हस्ते पार पडला.
“या जुन्या पुलाची दुरुस्ती व पुनर्वसन करून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पुलाच्या दुरुस्तीमुळे जुन्या पुलाचे आयुष्य वाढणार आहे, पुण्याकडून मुंबईच्या बाजूस जाणाऱ्या वाहनांसाठी दोन लेन उपलब्ध होणार असल्याने वाहतूक सुरळीत होऊन कोंडी सुटणार आहे. तसेच, इंधन बचत होणार असून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे.”
यावेळी अपक्ष आघाडी गटनेता कैलास बारणे, नगरसेविका माई काटे, नगरसेविका आशा शेंडगे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंबसे, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, प्रभाग अधिकारी श्री. खोत आदी उपस्थित होते.