शिरूर I झुंज न्यूज : माजी आमदार (स्व.) बाबूराव पाचर्णे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शिरूर शहर श्रीराम सेनेच्या वतीने, नगर परिषदेच्या, येथील अंगणवाडीतील लहानग्यांना बसण्यासाठी पन्नास खूर्च्या, चटई तसेच इतर शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले.
शहरातील मुंबई बाजार परिसरात शिरूर नगर परिषदेची अंगणवाडी असून, एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या या अंगणवाडीत सध्या ऐंशी लहान मुले शिकत आहेत. तेथे त्यांना खेळ, गाणी – गोष्टी, रंगओळख व इतर मनोरंजनात्मक बाबी शिकविल्या जातात. या लहानग्यांना बसण्यासाठी खूर्च्यांची कमतरता होती. ही गरज ओळखून श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी, माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून, गुरूवारी पन्नास छोट्या खूर्च्या तसेच पाच चटया, अंगणवाडी सेविकांसाठीही खूर्च्या व टेबल भेट दिले.
तर्डोबाची वाडीचे माजी सरपंच जगदीश पाचर्णे व जयहिंद सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश वाळूंज यांच्या हस्ते बाबूराव पाचर्णे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर अभिवादन करण्यात आले. अंगणवाडी साठी आणखीही मदत लागली किंवा काही शैक्षणिक साहित्याची आवश्यकता असल्यास ते साहित्य श्रीराम सेनेमार्फत उपलब्ध करून दिले जाईल, असे सुनिल जाधव यांनी सांगितले. बाबूराव पाचर्णे यांनी मोठ्या मनाने नेहमीच सेवाभाव जपला, त्यामुळेच त्यांना आपला माणूस ही आपुलकीची पदवी मिळाली, असे स्वप्निल रेड्डी म्हणाले.
श्रीराम सेनेचे शहर अध्यक्ष सुनिल जाधव, स्वप्निल अण्णा रेड्डी, सिद्धान्त चव्हाण, महेंद्र येवले, आकाश चोरे, सुनिल जठार, नीलेश धावडे, सुरेश आरेकर आदी यावेळी उपस्थित होते. अंगणवाडीच्या मुख्याध्यापिका निलिमा कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अंगणवाडी सेविका सुलभा बनसोडे यांनी आभार मानले.