“जगप्रसिद्ध उद्योगपती पद्मश्री बी जी शिर्के साहेब यांची आज 105 वी जयंती… महाराष्ट्र आणि देशाच्या बांधकाम क्षेत्रामध्ये “सिपोरेक्स” हे नवे क्रांतिकारी तंत्रज्ञान आणुन आपल्या विलक्षण कल्पकतेने ते प्रत्यक्षात यशस्वी करुन दाखविणाऱ्या बी.जी.शिर्के यांच्या यशाची कहाणी सुद्धा तितकीच संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. जाणुन घेऊया बांधकाम क्षेत्रातील शिवाजी म्हणजेच बी.जी.शिर्के यांच्याविषयी…
बी.जी.शिर्के उर्फ बाबुराब गोविंदराव शिर्के यांचा जन्म १ ऑगस्ट १९१८ रोजी पसरणी ता.वाई जि.सातारा येथे एका अल्पभुधारक शेतकरी कुटुंबात झाला. आईवडील दोघेही अशिक्षित. त्यांच्या गावालाही शिक्षण आणि व्यवसायाची कसलीच पार्श्वभुमी नाही. छत्रपती शिवरायांच्या प्रतापगड रणसंग्रामाच्या काळातील घटनांमध्ये उल्लेख असणारा हा पसरणीचा भाग. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतुन कमवा व शिका पद्धतीने वाईच्या द्रविड हायस्कुलमधुन त्यांनी आपले शालेय शिक्षण पुर्ण केले. पुढे त्यांनी पुण्यात फर्ग्युसन व नंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातुन सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. शिकत असताना खानावळीत वाढपी (वेटर) म्हणुन त्यांनी काम केले. ६ जुन १९४३ रोजी बांधकाम अभियांत्रिकी पदवी पुर्ण केली. वाई पसरणी भागातील त्या काळचे ते पहिले इंजिनिअर होते.
नोकरी न करता स्वतःची कंपनी सुरु करावी अशी त्यांची महत्त्वाकांक्षा होती. परंतु सुरुवातीला अनुभवासाठी नाशिक येथे त्यांनी तेजुकाया बांधकाम कंपनीत काही दिवस नोकरी केली. त्यानंतर ९ सप्टेंबर १९४४ रोजी दसऱ्याच्या मुहुर्तावर त्यांनी कोणतेही पैशाचे पाठबळ नसताना, व्यावसायिक परंपरा नसताना आपल्या जिद्द आणि ज्ञानाच्या जोरावर आपल्या Supreme Construction या कंपनीची पायाभरणी केली.
कामाच्या शोधात सुरुवातीला ते सायकलवर फिरले. पुण्यातील लष्करी अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्याला काम मिळावे अशी त्यांनी विनंती केली. शिर्केंची जिद्द, कष्ट आणि प्रामाणिक धडपड बघता अधिकाऱ्याने त्यांना काम दिले. पुण्याच्या लष्करी छावणीची कंपाउंड भिंत बांधण्याच्या कामापासुन शिर्केंनी आपल्या बांधकाम व्यवसायाला सुरुवात केली. लवकरच १९४५ मध्ये कोल्हापुर कारागृहाच्या बांधकामाचे मोठे कंत्राट त्यांना मिळाले. तिथुन त्यांचा नावलौकिक वाढला आणि लवकरच १९५३ मध्ये पुणे विद्यापीठात केमिस्ट्री डिपार्टमेंटची मोठी बिल्डिंग तसेच नीरा नदीवरील वीर येथील धरण अशी मोठी बांधकामे त्यांनी पुर्ण केली. हळुहळु त्यांचा व्यवसाय स्थिरावु लागला. शिर्केंच्या कामाची गुणवत्ता पाहुन शंतनुराव किर्लोस्कर यांनी १९६२ ते १९८१ पर्यंतची आपल्या कंपनीची पुण्यातील सर्व बांधकामे शिर्केंना विनानिविदा करण्यास दिली.
वसायात थोडीशी स्थिरता आल्यानंतर बी.जी.शिर्केंनी मागे वळुन न बघता व्यवसायाचा विस्तार करण्यास सुरुवात केली. पडेल ते कष्ट करण्याची तयारी, कोणत्याही संकटाला तोंड देण्याची धैर्य, गुणवत्तेचा आग्रह, कल्पकवृत्ती, अफाट जिद्द, समाजसुधारणेची तळमळ आणि भ्रष्टाचाराची चीड या गुणांच्या जोरावर त्यांनी आपला शिर्के कन्स्ट्रक्शन व्यवसाय वेगळ्या उंचीवर नेला. सहा दशकांहुन अधिक काळ बांधकाम उद्योगविश्वात बी.जी.शिर्के यांच्या नावाचा बोलबाला राहिला.
बांधकाम क्षेत्रात जागतिक स्तरावर एक यशस्वी उद्योजक म्हणुन त्यांनी ख्याती मिळविली. परंतु हे यश मिळविताना, मुख्यत्वे “Siporex म्हणजे शिर्के” हे समीकरण साधताना त्यांच्या सहनशीलतेचा खुप अंत पाहिला गेला. सिपोरेक्स या बांधकामाचे साहित्य निर्माण करणाऱ्या कंपनीची भारतात स्थापना करताना त्यांना खुप संघर्ष, अडथळे, सरकारी कारभार, भ्रष्टाचार, तांत्रिक अडचणी, अतोनात भांडवल अशा गोष्टींवर मात करावी लागली.
दरम्यानच्या काळात दुबईमध्ये बांधकामासाठी माणसांचा तुटवडा निर्माण झाला होता. माणसं मिळेनात इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी बांधकामासाठी बी.जी.शिर्केंच्या “सिपोरेक्स”ला काम मिळाले. त्यांनी भारतातुन लोकं नेऊन दुबईत अनेक इमारती, मशिदी उभ्या केल्या. दुबईच्या या पहिल्या कामाने “सिपोरेक्स” तारली गेली. आज जगात दुबईला जी प्रतिष्ठा आहे, त्या दुबईच्या उभारणीत महाराष्ट्रातल्या या मर्द मावळ्याचा महत्वाचा वाटा असणं ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
१४ ऑगस्ट २०१० रोजी वयाच्या ९२व्या वर्षी बी.जी.शिर्के यांचे निधन झाले. त्यांचे “जिद्द” नावाचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. २००३ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले आहे. महाराणी येसुबाई (छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी व राजेशिर्के घराण्यातील कन्या) यांचे जगातील पहिले स्मारक त्यांनी शिरकोली येथे बांधले आहे.
आदरणीय बी.जी. शिर्के साहेबांच्या 105 व्या जयंतीनिमित्त सर्वांना विनम्र अभिवादन 🙏💐 (- सौ. सोशल मीडिया)