– आमदार महेश लांडगे यांच्या प्रशासनाला सूचना
– आयुक्त शेखर सिंह यांचा सकारात्मक प्रतिसाद
पिंपरी I झुंज न्यूज : टाळगाव चिखली आणि तळवडे परिसरातील अंतर्गत रस्त्यांची कामे तातडीने हाती घ्यावीत. मुख्य रस्त्यांना जोडणारे रस्ते सुसज्ज करुन वाहतूक सक्षम करावी, अशी सूचना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे. त्यामुळे चिखली व तळवडे परिसराच्या ‘कनेक्टिव्हीटी’ला चालना मिळणार आहे.
याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी समाविष्ट गावांतील विकासकामांबाबत विविध मुद्यांवर चर्चाही करण्यात आली. आयुक्तांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत १९९९ साली टाळगाव चिखली आणि तळवडे गावचा समावेश झाला आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, चिखली-मोशी-चऱ्होली असा सर्वात मोठा ‘रेसिडेन्सिअल कॉरिडॉर’ विकसित होत आहे. चिखली गावाला ऐतिहासिक वारसा आहे.
राज्यातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना अध्यात्म आणि वारकरी सांप्रदायाचे शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यातील पहिले जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ टाळगाव चिखली येथे सुरू झाले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातून या ठिकाणी अध्यात्म आणि वारकरी सांप्रदयातील व्यक्ती चिखलीला भेट देतात. तळवडेत आयटी पार्क आणि औद्योगिक पट्टा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रहदारी असते.
श्रीक्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र आळंदीला जोडणारा रस्ता चिखलीतून जातो. चाकण औद्योगिक पट्यातून ये-जा करणारे कामगार, कष्टकरी, तळवडे एकआयडी, जाधववाडी भागातील व्यावसिक पट्टा या भागातून मोठ्या प्रमाणात चिखलीतून रहदारी होत असते. मात्र, गेल्या अडीच-तीन वर्षांत चिखली आणि परिसरातील अंतर्गत रस्त्यांची कामे ज्या गतीने होणे अपेक्षीत आहे, तसे झालेले दिसत नाही.
२०१४ ते २०१९ दरम्यान काही रस्त्यांची कामे पूर्ण झालेली आहेत. मात्र, महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात अनेक रस्त्यांची कामे रखडली आहेत. त्यामुळे चिखली आणि परिसरातील खाली नमूद केल्याप्रमाणे रस्ते तात्काळ विकसित करावेत, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.
… या रस्त्यांच्या कामाला प्राधान्य देणार !
१) प्रभाग क्रमांक १ चिखली मधील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय ते संतपिठकडे जाणारा 18 मीटर रुंद डीपी रस्ता व इतर डीपी रस्ते विकसित करणे. २) प्रभाग क्रमांक १ चिखली मधील साने चौक ते चिखली चौक रस्ता मंजूर विकास आराखड्यानुसार विकसित करणे. ३) प्रभाग क्रमांक १ चिखली मधील देहू आळंदी ते सोनवणे वस्ती कडे जाणारा ३० मीटर रुंद डीपी रस्ता विकसित करणे. ४) स्पाइन सिटी चिखली ते पुणे नाशिक रोड, ५) प्रभाग क्रमांक 12 मधील त्रिवेणी नगर चौक ते तळवडे चौकापर्यंत 24 मीटर रस्ता विकसित करणे. ६) प्रभाग क्रमांक 12 मधील कॅनबे चौक ते भक्ती शक्ती चौकापर्यंत देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतून जाणारा नोन डीपी रस्ता विकसित करणे. ७) प्रभाग क्रमांक 12 मधील नदीच्या कडेने जाणारा मंजूर विकास योजनेतील रस्ता विकसित करणे १२ मीटर रुंद, ८) प्रभाग क्रमांक 12 मधील कॅनबे चौक ते स्पाइन रस्त्याला जोडणारा 18 मीटर रुंद डीपी रस्ता विकसित करणे. ९) तळवडे ते चऱ्होली नदीपात्रातील रस्ता विकसित करणे, १०) मौजे तळवडे येथील त्रिवेणी नगर येथील 75 मीटर स्पाइन रस्ता विकसित करणे आदी रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
“चिखली आणि तळवडे परिसरातील मुख्य रस्त्यांना पर्यायी रस्ते विकसित करुन शहराच्या मुख्य रस्त्यांना जोडल्यास ‘कनेक्टिव्हीटी’ वाढणार आहे. वाहतूक कोंडी कमी होईल आणि वाहनचालक- नागरिकांचा वेळ आणि इंधनाची बचत होईल. त्यामुळे महापालिका विकास आराखड्यानुसार (DP) रस्त्यांच्या विकासाची कामे हाती घेण्यात यावी. त्यामुळे नव्याने वास्तव्यास आलेल्या नागरिकांना पायाभूत सुविधा मिळतील, अशी अपेक्षा आहे.
– महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.