प्रेरणा परिवार सोशल फाउंडेशनच्या वतीने वारकऱ्यांना भजनी मालिकांचे वाटप
पुणे I झुंज न्यूज : वारी हा मनुष्य जीवनातील एक आनंदाचा सोहळा आहे. लहानथोर सर्वांना सामावून घेणारी वारी ही आपल्या संस्कृतीचे, एकतेचे दर्शन घडवते. वारी ही आपल्या महाराष्ट्रातील मानवी जीवनातील सद्गुणांची जोपासना करायला शिकवते. असे मत प्रेरणा परिवार सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष कांतीलाल गुजर यांनी व्यक्त केले. ते प्रेरणा परिवार सोशल फाउंडेशनच्या वतीने वारीच्या वाटेवर भजनी मालिका वाटप कार्यक्रमात बोलत होते.
याप्रसंगी ह.भ.प नितिन महाराज काकडे, बँकेचे व्हाइस चेअरमन सुरेश पारखी, ज्येष्ठ संचालक श्रीधर वाल्हेकर, संतोष मुंगसे, अजितकुमार जाधव, नाना शिवले,अक्षय गुजर, मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
गुजर पुढे म्हणाले, वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही. ’पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाचे’ या भावनेतून वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी, जीवनाचे सार्थक झाल्याचा विचार मनात करत वारी करतात. आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी मनात एकमेकांबद्दल आदराचे आणि श्रद्धेचे स्थान निर्माण करते. संतसाहित्याचा ठेवा वारकरी भजनी मालिकेच्या रूपात आपल्याकडे प्रसिद्ध आहे. आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक लहानथोर व्यक्तीला मालिकेचे सहज वाचन व्हावे, सतत मालिका सोबत ठेवता यावी. यासाठी मंगलाचरण १ ते ७, काकड आरती, भूपाळ्या, वासुदेव, जोगी, आंधळे पांगुळे, मुका, बहिरा, गौळणी संग्रह, रूपके, अभंग, हरिपाठ, आरत्या, पसायदान या सर्वांचा समावेश असलेली वारकरी भजनी मालिका खिशात ठेवता येईल अशी छोटी पण अर्थाने मोठी असणारी मालिका देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
नितिन महाराज काकडे म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची, शुरांची आणि वीरांची भूमी आहे. या संतांनी महाराष्ट्राला एक आध्यात्मिक, वैचारिक बैठक घालून दिली. सामाजिक बांधिलकी, कर्तव्यनिष्ठा आणि संस्कृतीरक्षणाचे विचार दिले.भक्तीचा मार्ग सर्वांना मोकळा केला. संतांनी नेहमीच समाजातील सद्गुणांची पाठराखण करत वाईट वृत्तींचा नाश व्हावा यासाठी जनजागृती केली. आपले अनुभव समाजाला कथन केले व जीवनाचे सार कशात आहे, हे समजावले. ही वारकरी भजनी मालिका आपल्याला निश्चितच उपुयुक्त ठरेल. खरं तर वारकरी संप्रदायाची या निमित्ताने सेवा करण्याची संधी मिळाली, हे आम्ही आमचे भाग्य समजतो.
प्रेरणा परिवाराचे प्रमुख तुकाराम गुजर यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून स्थापन केलेल्या श्रीमती वाराबाई लक्ष्मणराव गुजर प्रासादिक दिंडी सोहळ्यात सहभागी होत अनेक वारकऱ्यांना भजनी मालिकांचे वाटप करण्यात आले.