राजमाता जिजाऊंच्या स्मृतिदिनानिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने अभिवादन
पिंपरी I झुंज न्यूज : स्वराज्याला लौकिक कसा मिळवून द्यायचा याचे बाळकडू मुलांमध्ये कसे रुजवायचे हे कृतीतून दाखवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आहेत. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचे राज्य उभारण्यास प्रेरणा दिली. स्वराज्य आणि सुराज्य यांच्या निर्मितीचा आदर्श म्हणजे राजमाता जिजाऊ असल्याचे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतिश काळे यांनी केले.
राजमाता जिजाऊ स्मृतिदिनानिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने थेरगाव येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयात अभिवादन करण्यात आले. या वेळी उमरगा शहर कार्याध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या वेळी संभाजी ब्रिगेडचे शहर कार्याध्यक्ष सुभाष जाधव, उपाध्यक्ष निरंजन सोखी, संघटक गणेश पारदे, बालाजी पाटील, मराठा सेवा संघाचे गजानन आढाव आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
काळे म्हणाले की, इतिहासात अनेक दैदीप्यमान कामगिरी करणाऱ्या महिला होऊन गेल्या. त्यापैकी अनेकांनी इतिहास घडविला तर काहींनी इतिहास निर्माण करणारे युगपुरुष घडविले.अशा एका प्रकाशमान स्त्रीचा जन्म सूर्योदयी झाला. ती स्त्री म्हणजे राजमाता जिजाऊ असल्याचे सतिश काळे म्हणाले.