पिंपरी | झुंज न्यूज : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केला. काही वारकऱ्यांनी तर आम्हाला एकांतात नेऊन पोलिसांनी मारल्याचे सांगितले. आजपर्यंत अशी घटना कधीच घडली नव्हती. यंदा मात्र पोलिसांनी वारकऱ्यांना मारहाण केल्याने वारीला गालबोट लागले आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषी पोलिसांवर कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
आळंदी येथून रविवारी संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. पालखीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. वारकरी संप्रदाय हा भक्तिमार्गाने जाणारा, सर्व परिस्थितीशी विनातक्रार जुळवून घेत माऊलीच्या ओढीने हा वर्षानुवर्षे यात्रेचा प्रवास करीत असतो. या परंपरेला गालबोट लागणारी घटना घडल्याचे आजवर कधीही समोर आलेले नाही. यंदा वारी सोहळ्याला पोलिसांमुळे गालबोट लागले आहे. माऊलींच्या पालखीचे आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान होत असताना वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. यात स्पष्टपणे पोलीस वारकऱ्यांना मारहाण करताना दिसत आहेत.
प्रस्थानावेळी किती वारकऱ्यांना मंदिरात सोडले जाणार आहे, याची पोलिसांना माहिती होती. त्यानुसार पोलिसांनी नियोजन करणे आवश्यक होते. देवस्थानच्या विश्वस्तांसह किती वारकऱ्यांना आतमध्ये सोडले जाणार याची माहिती देणे अपेक्षित होते. पण, वारकऱ्यांना समजून सांगण्यात पोलिसांना अपयश आले. पोलिसांकडे नियोजनाचा अभाव दिसला. सुरक्षेचा बाऊ केला. पालखी सोहळ्या दरम्यान जे आजवर कधीही घडले नाही ते यावर्षी घडले.
यापूर्वी कधीही वारकऱ्यांवर पोलीस बळाचा वापर केल्याची घटना घडली नव्हती. साध्या आणि सोप्या शिकवणूकीतून वारकऱ्यांनी देशाला वेळोवेळी दिशा दाखविली आहे. माऊलींच्या दिंडीसोहळ्याला प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे गालबोट लागले. दिंडीसोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांवर झालेला लाठीहल्ला हा अतिशय संतापजनक प्रकार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. त्यात दोषी आढळल्यास संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी गव्हाणे यांनी निवेदनातून केली आहे.