पिंपरी I झुंज न्यूज : हॅलो, मुख्यमंत्री कार्यालयातून बोलतोय, तुमच्या महाविद्यालयात आमचा एक प्रवेश करून द्या… असे म्हणून संस्था चालकांची व पालकांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राहुल राजेंद्र पालांडे या आरोपीस याला नुकताच जमीन मंजूर करण्यात आला आहे. ॲड. राजेश राजपुरोहित यांनी आरोपीच्या बाजूने युक्तिवाद केला आहे.
पुणे आणि पिंपरी -चिंचवड शहरातील हिंजवडी, लवळे, पुणे आणि बंगळूर येथे सिंबायोसिस आणि डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये चार ॲडमिशन मिळवून देण्यासाठी त्या व्यक्तीने मुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असल्याचे भासवले अन् विद्यार्थ्यांचे प्रवेश करुन घेतले. मग हे प्रवेश मिळवण्यासाठी त्यांच्यांकडून पैसे घेतले. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी एका कार्यक्रमानिमित्त शहरात आले होते. यावेळी हा सर्व प्रकार उघडकीस आला होता.
पालांडे याने त्याच्या फोन नंबरला ‘ट्रू कॉलर’वर सीएमओ ऑफिस महाराष्ट्र शासन मुंबई असे स्वतः सेव्ह केले होते. त्यामुळे तो ज्यांना फोन करतो त्या व्यक्तीच्या ‘ट्रू कॉलर’वर मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला, असे वाटत असते. पालांडे याने व्हॉट्सॲप डीपीवर शासनाचे बोध चिन्ह ठेवले. इतकेच नाही तर त्याच्या फेसबूकवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री उदय सामंत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, अनेक कॅबिनेट मंत्री यांच्याबरोबरचे फोटो आहेत. यामुळे तो सरकारी अधिकारी असल्याचे अनेकांना वाटते.
पालांडे यांनी केलेला प्रकार उघड झाल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. 23/05/2023 रोजी भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 417, 419, 420, 467, 468, 469, 472, 484, 488, 170, 171 सह आय टी अॅक्ट 66 (सी) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आले व राहुल राजेंद्र पालांडे (वय 31 वर्षे रा; चिंचवड ) यांना अटक केले व त्यानंतर राहुल राजेंद्र पालांडे यांना मे. न्यायालयाने पालांडे याला न्यायालीन कोठडीत रवानगी केली होती.
आरोपीचे वकील ॲड. राजेश राजपुरोहित व ॲड. हर्षवर्धन राजपुरोहित यांनी बाजु मांडत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर मे. न्यायाधीश वी.पी. खंडारे साहेब यांच्यापुढे नुकतीच सुनावणी पार पडली. दोषारोप पत्र दाखल नसताना उच्च न्यायालयाच्या विविध निकालांच्या दाखल्यांचा आधार घेत ॲड. राजेश राजपुरोहित व ॲड. हर्षवर्धन राजपुरोहित यांनी केलेला युक्तिवाद ग्रहीतधरत आरोपी यांना जामीन मंजूर करण्यात आले.