मुंबई I झुंज न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लहरी राजा आहेत. त्यामुळे नोटबंदीसारखे निर्णय घेत आहेत, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मोदींच्या विरोधात कोणता निकाल गेला, वातावरण विरोधात गेलं की त्यावर पाणी टाकण्यासाठी उलटसुलट निर्णय घेतले जातात हा आतापर्यंतचा इतिहास आहे, असंही राऊत म्हणाले. मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
दोन हजारांच्या नोटा रद्द करणं यावर फार चर्चा न करता या देशाला एक लहरी राजा मिळाला आहे. तो लहरी राजा अशाच प्रकारचे निर्णय घेणार आहे. हे गृहीत धरून 2024 पर्यंतचा काळ ढकलला पाहिजे. कर्नाटकातील पराभव अत्यंत दारूण आहे. भाजपला खरं तर या देशाची मानसिकता काय आहे हे समजून घेणारा कर्नाटकाचा निकाल आहे. कर्नाटक हे दक्षिणेतील महत्त्वाचं राज्य आहे. दक्षिणेत प्रखर हिंदुत्व आहे. कर्नाटकातही आहे. तिथे सर्वाधिक मंदिर आहे. कर्नाटकात सर्वाधिक हिंदूंचे सण आणि उत्सव साजरा केले जातात. तरीही हिंदुत्ववादी आणि श्रद्धाळू राज्याने भाजपचा पराभव केला. हे सत्य भाजप का स्वीकारत नाही. सत्य स्वीकारायला शिका. अशा प्रकारचे पराभव तुमच्या वाटेला नेहमी येणार आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
निवडणुकीची हिंमत का दाखवत नाही?
पालिकेच्या निवडणुका घेण्यासाठी का टाळाटाळ करत आहात? मुंबई, ठाण्यासह 14 महापालिकेच्या निवडणुका घेण्याची हिंमत का दाखवत नाही? मोदी-शाह यांना प्रचाराला येऊ द्या ना. कुणालाही प्रचारा येऊ द्या. इथे तंबू ठोकून बसा प्रत्येक पालिकेच्या हद्दीत. कुठेही जा. पण निवडणुका घ्या. मग दाखवू आम्ही तुम्हाला जनमत कुणाच्या बाजूने आहे आणि कुणाला जागा मिळतात, असं राऊत म्हणाले.
त्यात काय विशेष?
आदित्य ठाकरे यांना भावी मुख्यमंत्री संबोधणारे पोस्टर्स नागपुरात लागले आहेत. त्याबाबत राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे? असा सवाल त्यांनी केला. कार्यकर्त्यांच्या भावना असतात. त्यामुळे ते पोस्टर्स लावतात. लावू द्या, असंही संजय राऊत म्हणाले.