पिंपरी I झुंज न्यूज : पाकिस्तानी एजंटला गुप्त माहिती पुरवल्याप्रकरणी डीआरडीओचे शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुळकर यांना महाराष्ट्र एटीएसने पुण्यातून ५ मे ला अटक केली. पाकिस्तानला व्हाट्सअपवरुन कॉल आणि मॅसेजवरून गुप्त माहिती पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यातील कलमांमध्ये देशद्रोह व दहशतवादी कलम या कलमांची वाढ करून, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संरक्षण संशोधन संस्था डी.आर.डी.ओ.चे आरोपी प्रदीप कुरुलकर यांनी बेकायदेशीर कृत्य करून तसेच देशद्रोहासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आपल्या पदाचा गैरवापर करून जाणीवपूर्वक केले आहेत, डी.आर.डी.ओ.भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयातील संरक्षण संशोधन आणि विकास विभागाअंतर्गत काम करणारी प्रमुख संस्था आहे. जी संस्था लष्कराच्या संशोधन आणि विकास कार्यासाठी प्रभावीपणे काम करते.आरोपी हा सदरील संस्थेचा अधिकारी असून त्याने सोशल मिडिया तसेच फोन कॉल्स आणि व्हाट्सअप व्हिडिओ कॉलद्वारे शत्रू राष्ट्र पाकिस्तानमधील गुप्तचर संस्थेला तसेच आय.एस.आय.(ISI) सारख्या घातक दहशतवादी संस्थेला भारतीय लष्करातील क्षेपणास्त्रा संदर्भातील अत्यंत गोपनीय माहिती पुरवली असल्याचे समोर आले आहे.
तसेच आरोपीने डिप्लोमॅट पासपोर्टवर परदेश दौरे देखील केल्याचे निदर्शनास आले आहे,असे ए. टी. एस.ने त्यांच्या तपासामध्ये सांगितले आहे, त्यामुळे आरोपीची देशपातळीवर नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर तपास होणे गरजेचे आहे परंतु पुणे ए.टी.एस.(ATS) ने जाणीवपूर्वक या गुन्ह्यामध्ये नाममात्र कलम दाखल करून कोणाच्या तरी दबावाखाली तपास करत असल्याचे यामधून स्पष्ट होत आहे.
सदरील आरोपीवर देशद्रोहाचे कृत्ये (प्रतिबंधक) अधिनियम १९६७ तसेच देशद्रोह कलम १२४(अ) भारतीय दंड विधान १८६० अंतर्गत कारवाई होणे गरजेचे असून ए.टी.एस.ने नाममात्र कलम दाखल करून आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. म्हणून संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे लीगल सेलचे ॲड. तोसिफ शेख ॲड. क्रांती सहाणे,ॲड.सुरज जाधव, ॲड.जयदीप डोके पाटील,ॲड. स्वप्नील गिरमे,ॲड.दीपक गायकवाड,ॲड.शिवानी गायकवाड यांनी शिवाजीनगर ए.टी.एस.(ATS) च्या कार्यालयात जाऊन तपास करत असलेल्या (ATS) ए.टी.एस.अधिकारी सुजाता तानवडे यांना प्रत्यक्ष भेटून सदरील निवेदन देण्यात आले.
“साध्या चोरीच्या प्रकरणात पोलीस चौदा-पंधरा दिवस पोलीस कोठडीत ठेऊन तपास करतात परंतु,सदरील गुन्ह्यांमध्ये (ATS) ए.टी. एस.ने अत्यंत गंभीर गुन्हा असून देश व विदेश पातळीवर तपास करणे गरजेचे असताना देखील (ATS) ए.टी. एस.ने आर.एस.एस.(R.S.S.) च्या दबावाखाली असल्याचे नाकारता येत नाही. म्हणून सदर कार्यप्रणालीवर विश्वास नसून सदरील प्रकरण NIA कडे वर्ग करण्यात यावे तसेच आरोपीवर ताबडतोब देशद्रोह व दहशतवादी कलम समाविष्ट करा अन्यथा उच्च न्यायालयात आरोपी विरोधात दाद मागण्यात येईल असे ॲड. तोसिफ शेख यांनी समाज माध्यमाशी बोलताना सांगितले.