पिंपरी I झुंज न्यूज : छत्रपती संभाजी महाराज यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा अभ्यास आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन पोलिस फ्रेंड वेल्फेअर असोसिएशन कार्याध्यक्ष विशाल क्षीरसागर यांनी केले. पिंपरी चिंचवड शहरातील शाहुनगर परिसरात असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी संतोष कदम, युवा प्रदेशाध्यक्ष बाराबलुतेदार महासंघ महाराष्ट्र भाई विशाल जाधव, पुणे जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड प्रवीण कदम, महीला सदस्य पिंपरी चिंचवड शहर रेखा आडागळे यांसह इतर सदस्य उपस्थित होते.
यावेळी अभिवादन करताना विशाल क्षीरसागर यांनी आपल्या मनोगतात म्हणले कि, 14 मे. छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी महाराज यांचा जन्मदिवस. इतिहासाच्या स्मृती पटलावर वर्चस्व गाजविणारे हे थोर व्यक्तिमत्व. इतिहासामध्ये एखादे व्यक्तिमत्व कसे अभ्यासावे याविषयी अनेकांमध्ये मतभेद असू शकतात. मात्र त्या व्यक्तिमत्त्वाला न्याय देणे आणि न्याय पद्धतीने आज त्या व्यक्तिमत्त्वाच्या ऐतिहासिक कार्याची चिकित्सा करणे त्यासाठी समकालीन साधने अभ्यासणे ही साधने खरी का खोटी याची चिकित्सा करणे त्यानंतरच इतिहास लेखनामध्ये लेखन मजकुराची भर आवश्यक आहे.
इसवी सन 1657 ते 1689 असा या थोर व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट. या कमी कालावधीत त्यांनी आपल्या वडिलांनी उभे केलेले स्वराज्य खूप चांगले सांभाळले. आता आपण आपल्या जीवनाचा विचार करू. जेवढे आयुष्य या महापुरुषास मिळाले तेवढे आयुष्य आपण जगलो आहोत असे समजा. तत्कालीन परिस्थिती वगळता इतर अनेक गोष्टींची तुलना करून पहा. एक घटक आपणांसमोर मांडतो. तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी या धावपळीच्या जीवनातही केलेले ज्ञान संपादन. त्यांना एकापेक्षा अधिक भाषांचे ज्ञान होते. एक राजा म्हणून त्यांचे स्थान उत्तम. भाषेचे विद्वान आणि पंडित म्हणून त्यांनी केलेली ग्रंथरचना अजून कित्येकांनी वाचलेली नाही ही इतिहास परिवाराची शोकांतिका आहे हे देखील मान्य करावे लागेल.
इतिहासात अनेक राजे पराक्रमी असतात. त्या पराक्रमाला नीतिमान व्यक्तिमत्त्वाची जोड देणे आवश्यक असते. ती राजांनी दिली. आपण वयाच्या नवव्या दहाव्या वर्षी काय करत होतो. आणि संभाजीराजांनी लहानपणातच उत्तर भारतामध्ये जाऊन मोगल दरबारात स्वतःच्या अमोघ अशा वक्तृत्व शैलीने एक स्थान निर्माण केले. अनेक विपरीत परिस्थितीमध्येही ते कधी डगमगले नाही. जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज जिवंत होते तोपर्यंत स्वतः मोगल बादशहा कधी दक्षिणेत स्वारी घेऊन आला नाही. 1681 नंतर मात्र एकाच वेळी औरंगजेब पोर्तुगीज आदिलशहा सिद्धी आणि विसरून चालणार नाही ते म्हणजे अनेक स्वकीय लोक देखील त्यांच्याविरुद्ध उभे राहिले. शांत धीर गंभीर मनाने त्यांनी या प्रत्येक गोष्टीचा प्रतिकार केला. स्वराज्य नष्ट करण्याच्या हेतूने पुरंदर किल्ल्यास वेढा दिलेल्या मिर्झाराजे जयसिंग ला भेटणारे संभाजी राजे त्यावेळी फक्त आठ वर्षे वयाचे होते. एवढा निर्भीडपणा दाखविणे हे विचारे आणि थोर पुरुषाचे लक्षण आहे. वयाच्या पंधराव्या वर्षी गुजरातची मोहीम कशी हाताळली याविषयीचा वृत्तांत आपणास समकालीन प्रवाशांच्या प्रवासवर्णनामधून पहावयास मिळेल.
16 81 ते 1689 या कालावधीत नऊ वर्षाच्या कालावधीत सर्व शत्रू एकाच वेळी त्यांच्यावर आक्रमण करत असतानाही संभाजी महाराजांनी परिस्थिती कशी हाताळली याविषयी सविस्तर वृत्तांत वाचावयाचा असेल तर त्यावेळच्या समकालीन साधनांची नोंद घेणे आवश्यक आहे. या साधनांवर आधारित असलेले संभाजी महाराज यांचे चरित्र लेखन ज्या ज्येष्ठ श्रेष्ठ इतिहास प्रभूतींनी केले त्यामध्ये प्रामुख्याने कमल गोखले डॉक्टर जयसिंगराव पवार. सदाशिव शिवदे. औरंगजेबाच्या तत्कालीन कागदपत्रांचा आधार घेऊन निर्माण झालेले ग्रंथ. जयसिंगराव पवार लिखित संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम खरे तर हे दोन ग्रंथ वास्तवाचे दर्शन घडविणारे आहेत. ज्यांना खरा इतिहास वाचायचा आहे त्यांनी कथा कादंबरी आणि नाटके यांना फाटा द्यावा.
मराठी साहित्य म्हणून त्यांचे स्थान मराठी साहित्यात वेगळे आणि महत्वपूर्ण असेल याविषयी शंका नाही. मात्र संभाजी महाराज यांच्या विषयी लिहिलेल्या कादंबरी नाटके आणि साहित्यकृती मी खात्रीपूर्वक असे सांगू शकेल की त्यांनी संभाजी महाराजांच्या जीवनाला यथायोग्य न्याय दिलेला नाही. अगदी सुप्रतिष्ठित अशा गीतकारांनी देखील आणि सिनेमासृष्टीने देखील हाच कित्ता पुढे ओढला आहे. म्हणून आपण मूळ साधने वाचली पाहिजेत. संभाजी महाराजांची राजनीती निपुणता किती उच्च दर्जाची होती याविषयी इतिहासकार वां. सी बेंद्रे लिखित समग्र साहित्याचा धांडोळा घेणे गरजेचे आहे. सेतू माधवराव पगडी लिखित मोगल दरबाराची बातमीपत्र याचे तीन खंड. हैदराबाद मराठी साहित्य परिषदेने प्रकाशित केलेले समग्र सेतू माधवराव पगडी एकदा उघडून पाहणे गरजेचे आहे. आणि विशेष म्हणजे स्वतः संभाजी महाराजांनी राजस्थानातील त्यावेळच्या सत्ताधीशांना लिहिलेले संस्कृत मूळ पत्र हे पत्र इतिहास तज्ञ डॉक्टर चंद्रकांत अभंग यांच्या संग्रहात असून ते त्यांनी श्री सदाशिव शिवदे लिखित संभाजी महाराज यांच्या चरित्र ग्रंथात मूळ पत्र छापले आहे. या ग्रंथाचे शीर्षक थोडे मोठे आणि किचकट वाटते पण ते खरे आहे.
संभाजी महाराज यांनी लिहिलेल्या ग्रंथाविषयी मंचर तालुका आंबेगाव येथील प्रमोद बाणखेले आपले पीएचडीचे संशोधन करत आहेत. त्यांच्या संग्रही ही सर्व ग्रंथ संपदा आहे. आणखी एका वास्तवदर्शी ग्रंथाचे नाव सुचवतो. डॉक्टर रामभाऊ मुटकुळे नांदेड यांनी लिहिलेले वास्तव इतिहास संभाजी महाराज हा ग्रंथ आपण जरूर पहावा. कथा आणि कादंबऱ्या यांनी विकृत केलेले संभाजी महाराजांचे चरित्र त्यांनी अक्षरशः उलगडून दाखवताना कोणता कादंबरीकार कोठे आणि कसा चुकला आहे याविषयीचे केलेले प्रतिपादन हे सर्वोच्च आहे.
थोडक्यात काय संभाजी महाराज राजनीति निपुण शास्त्रास्त्रांचे संपूर्ण ज्ञान. आणि उत्तम माणूस व राजा म्हणून आवश्यक असलेले सर्व गुण त्यांच्या अंगी होते. त्यांच्या जन्मदिनी त्यांचा प्रताप पाठवताना त्यांच्यातील एखादा गुण आपल्या अंगी आला तर किती बरे होईल. इतिहासातील व्यक्ती चरित्रांचा वेध अशाप्रकारे घ्यावा हीच खरी इतिहासाची शिकवण आहे.