मुंबई I झुंज न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज अखेर पत्रकार परिषद घेऊन गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या विविध घडामोडींवर भाष्य केलं. शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी ‘लोक माझ्या सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी आपल्या पक्षाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडत होता. शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्ते आणि दिग्गज नेत्यांनी शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. पण पवारांनी ती विनंती मान्य केली नाही. त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या. या घडामोडींवर आज अखेर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडली.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
“लोक माझ्या सांगाती या माझ्या आत्मचरित्रपर पुस्तक प्रकाशन समारंभाच्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. सामाजिक जीवनातील प्रदीर्घ प्रवासानंतर मी सदर जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी भूमिका होती. पण मी घेतलेल्या निर्णयाने जनमानसात तीव्र भावना उसळली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि माझे सांगाती असलेले जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली”, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांचा राजीनामा तीन दिवसांनंतर मागे
“मी निर्णयाचा फेरविचार करावा याकरीता माझे हितचिंतक माझ्यावर विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटीत होवून एकमुखाने मला आवाहन केलं. त्याचबरोबर जनमनातून, विशेषत: महाराष्ट्रातून विविध पक्षाचे सहकारी आणि कार्यकर्ते मी अध्यक्ष होण्याची जबाबदारी घ्यावी अशी विनंती केली. लोक माझ्या सांगाती हे माझ्या सामाजिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडे जवभावनांचा अनादर होऊ शकत नाही”, अशी भावना शरद पवार यांनी व्यक्त केली.
“आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारावून गेलो. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेलं आवाहन तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीमुळे, या संदर्भात त्यांनी घेतलेला निर्णय माझ्यापर्यंत पोहोचवण्यात आला. या सर्वांचा विचार करुन मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे, या निर्णयाचा मान राखून मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे”, अशी घोषणा शरद पवार यांनी केली.
“माझी जबाबदारी नैतिक अशी होती. मी सर्वांना विश्वासात घेतलं असतं तर त्यांनी परवानगी दिली नसती. पण मी त्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं, हे मी मान्य करतो. राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया उमटेल हे माहिती होती. पण इतकी तीव्र प्रतिक्रिया उमेटल असं वाटत नव्हतं”, असं शरद पवार म्हणाले.
उत्तराधिकारी कोण असणार?
“उत्तराधिकारी असणं हे माझं स्पष्ट मत आहे. पण उत्तराधिकारी राजकीय पक्ष ठरवत नसतात. लोक एकत्र काम करतात. सर्व सहकारी म्हणून काम करतात. हा कुणा एका व्यक्तीचा निर्णय असू शकत नाही”, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. “उत्तराधिकारी ही कन्सेप्ट त्यातली नाही. पण एक गोष्ट माझ्या मनात आहे. ती मी माझ्या सहकाऱ्यांना सांगेन आणि चर्चा करेल की, राजकारणात काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे”, असं शरद पवार यांनी सांगितलं.
“उदाहरणार्थ जे जिल्हा पातळीवर दहा ते पंधरा वर्ष काम करतात त्यांच्याबद्दल आम्हाला खात्री आहे की राज्य पातळीवर काम करु शकतात. जे राज्य पातळीवर काम करतात ते राष्ट्रीय पातळीवर काम करु शकतात. त्यांना प्रोत्साहित करणं आणि संधी देणं ही जबाबदारी माझी आणि पक्षातील सहकाऱ्यांची आहे”, असं शरद पवार म्हणाले.
अजित पवार गेले कुठे ?
शुक्रवारी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. परंतु अजित पवार आले नाही. या ठिकाणी काही काळ त्यांची वाटही पाहण्यात आली. यामुळे अजित पवार गेले कुठे? ही चर्चा सुरु झाली. २ मे रोजी सक्रीय असणारे अजित पवार ४ आणि ५ मे रोजी मात्र या सर्व प्रकरणाच्या वेळी शांत होते. सकाळी झालेल्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलले नाही.