पुणे I झुंज न्यूज : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. एका मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी दोषी ठरले. त्यानंतर त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांची खासदारकीही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे देशात एकच खळबळ उडालेली आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याने त्यावरून राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच संपूर्ण देशात काँग्रेसकडून ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत. ही घटना ताजी असतानाच आता पुण्यात काही होर्डिंग्ज लागले आहेत. बच्चू कडू यांची आमदारकी कधी रद्द करणार? असा सवाल या होर्डिंग्जवरून करण्यात येत आहे. त्यामुळे बच्चू कडू यांची आमदारकी राहणार की जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
काय आहे पोस्टर्समध्ये?
राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पुण्यातील पाषाण परिसरात हे पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टरमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खास पुणेरी शैलीतून टोले लगावण्यात आले आहेत. आमदार बच्चू कडू यांना काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्यांची आमदारकी कधी रद्द होणार? नियम सर्वांना सारखेच असले पाहिजे, असं या होर्डिंग्जवर लिहिलं आहे.
अपना भिडू, बच्चू कडू असंही या होर्डिंग्जवर लिहिलं आहे. निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान, असा चिमटाही या होर्डिंग्जमधून लावण्यात आला आहे. #अदानीराज, #हुकूमशाही, #लोकशाहीवाचवा, #द्वेषाचंराजकारण, असे हॅशटॅगही त्यावर लावण्यात आले आहेत. सर्वात शेवटी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर, असं लिहिलं आहे.
चर्चा तर होणारच
मुख्य रस्त्यांच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी हे होर्डिंग्ज लावण्यात आल्याने हे होर्डिंग्ज सर्वांचे लक्ष वेधत आहेत. तसेच या होर्डिंग्जवरील मजकूरामुळे एकच चर्चा रंगली आहे. त्याशिवाय आता बच्चू कडू यांची आमदारकी रद्द करण्याच्या मागणीनेही जोर धरला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांची आमदारकी रद्द होणार की त्यांना अभय मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मी आनंद साजरा करीन
या प्रकरणावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बॅनर लावलेले कार्यकर्ते अतिउत्साही आहे. मी केलेलं आंदोलन हे स्वत:साठी नाही. मी अंपग बांधवांसाठी आंदोलन केलं होतं. मला दोन गुन्ह्यात एक एक वर्ष शिक्षा आहे. माहिती घेत नसल्यामुळेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी मागे आहेत. माझी आमदारकी गेली तरी मी आनंद साजरा करीन, असं बच्चू कडू म्हणाले. राहुल गांधीवरील कारवाई चुकीची वाटते. ही घाईघाईत केलेली कारवाई आहे. अशी घाई सर्व सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी करावी. सर्व सामान्यांपर्यंत सरकारने जायला हवं, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला.
त्यांना निर्णय मान्य नव्हता
बच्चू कडू यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. बच्चू कडू यांना शिक्षा सुनावल्यानंतर ते वरच्या न्यायालयात गेले. त्यांना ती शिक्षा मान्य नव्हती. मात्र राहूल गांधी वरच्या न्यायालयात गेले नाही याचा अर्थ त्यांना शिक्षा मान्य आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.