मुळशी I झुंज न्यूज : मुळशी तालुक्यातून महाराष्ट्र केसरी घडावेत, यासाठी मुळशी केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. रविवार दि. १२ मार्च रोजी घोटवडे फाटा, ता.मुळशी येथे या कुस्ती स्पर्धेचे मुळशी केसरी प्रतिष्ठानच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे १७ वे वर्ष असून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या नियमाने व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने स्पर्धा आयोजित केली जात आहे.
तसेच यावेळी स्पर्धेचे मुख्य आकर्षण असलेल्या अमृता केसरी किताबासाठी ७४ किलो वजन गटातील अंतिम फेरीत दाखल झालेल्या मल्लांमध्ये कुस्ती होणार आहे. तर या संपुर्ण स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील मल्लांनाच प्रवेश दिला जात असल्याचे संयोजकांनी सांगितले. या स्पर्धेत हिंदकेसरी अभिजीत कटके, महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांचा विशेष सत्कार करणार असल्याचेही संयोजकांनी सांगितले.
मुळशी तालुक्याला कुस्तीगिरांची मोठी परंपरा आहे. कै.मामासाहेब मोहोळ यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली आणि त्यातून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची सुरवात करण्यात आली. त्यामुळे मुळशीत कुस्तीचे असे विशेष महत्व आहे. त्यामुळे कै.मामासाहेब मोहोळ यांच्या तालुक्यातील यंदाच्या मुळशी केसरी स्पर्धेचा विजेता कोण होणार, याकडे पुणे जिल्ह्यातील कुस्तीगिरांचे लक्ष लागून राहिले आहे.
स्पर्धेच्या दिवशी सकाळी ९ ते १२ या वेळेत कुस्तीगिरांची वजने होणार आहेत. स्पर्धेसाठी ४५ किलो व ५५ किलो हा वजनी गट मुळशी तालुका मर्यादित राहिल. १७ वर्षांखालील स्पर्धकांना या गटात सहभाग घेता येणार आहे. यातील सहभागी स्पर्धकांनी येताना सोबत वयाचा पुरावा घेऊन यावे लागणार आहे. ५७ किलो, ६१ किलो, ६५ किलो, ७० किलो, ७४ किलो असे वजन गट आहेत. प्रत्येक गटातील पहिल्या चार विजेत्यांना गौरविण्यात आले आहे. तर मुळशी किताबासाठी खुला गट असणार असून यातील विजेत्यास ३१ हजार रुपये रोख व चांदीची खरी गदा रांका ज्वेलर्सच्या पावतीसह तर उपविजेत्यास २१ हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. या गटातील तृतीय व चतुर्थ क्रमांक विजेत्यांनादेखील बक्षीस मिळणार आहे. तर अमृता केसरी किताब कुस्तीतील विजेत्यास रोख २५ हजार व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
संपुर्ण स्पर्धेत प्रत्येक गटामध्ये एकूण चार क्रमांक काढले जाणार असून सर्व गटातील पहिल्या ४ विजेत्यांना चांदीची नोट व ट्रॅकसूट तसेच रोख रक्कमेचे बक्षिस आहे. स्पर्धेचे आयोजन मुळशी केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बांदल, प्रतिष्ठानचे संस्थापक भास्कर मोहोळ, कार्याध्यक्ष बाळासाहेब आमले, प्रतिष्ठानचे सचिव शरद पवार, खजिनदार पै.सचिन मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. स्पर्धेच्या ठिकाणी खेळाडूंची उत्तम सोय केली असून आपत्कालीन व्यवस्था देखील उपलब्ध असणार आहेत.
स्पर्धेच्या उदघाटन समारंभास रविवारी दुपारी १ वाजता बहुचर्चित कसबा विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर उपस्थित राहणार आहेत. त्यांचा वाढदिवस असूनही उपस्थित राहत असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. तर बक्षीस वितरण समारंभास सायंकाळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुनील शेळके, आमदार निलेश लंके व आमदार संग्राम थोपटे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संयोजकांनी दिली.