झारखंडचे रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
महापुरुषांच्या विरोधात अवमानकारक उद्गार काढणे कोश्यारींना भोवले
नवी दिल्ली I झुंज न्यूज : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात अवमानकारक उद्गार काढणं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना चांगलंच भोवलं आहे. या विधानावरून राज्यपाल कोश्यारी यांच्यावर चौफेर टीका झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सोपवण्यात आला होता. कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला आहे. त्यांच्या जागी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून झारखंडचे रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करण्याची विरोधकांनी मागणी लावून धरली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याने विरोधकांच्या मागणीला यश आलं आहे.
विरोधकांची मागणी आणि सातत्याने होणारे आंदोलन यामुळे राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदमुक्त करण्याची इच्छा दर्शवित राजीनामा दिला होता. पंतप्रधान कार्यालयाने कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवला होता. राष्ट्रपतींनी हा राजीनामा मंजूर केला. त्यामुळे राज्यपाला कोश्यारी अखेर पायउतार झाले आहेत.
काही दिवसांनी महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राज्यपाल अभिभाषण करत असतात. यावेळी विरोधकांकडून राज्यपालांचा विरोध होण्याची दाट शक्यता होती. नुकतेच दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे कोल्हापूरमधील नेते संजय पवार यांनी राज्यपालांविरोधात आक्रमक आंदोलन केले होते. मविआचे नेते सतत राज्यपाल हटाव मोहीम राबवत होते. त्यासाठी ते आग्रही होते. अखेर राज्यपालांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर विरोधकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.