महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ‘‘इंद्रायणी थडी’’ ला भेट देत महिला बचतगट व स्टॉलधारकांशी साधला संवाद
भोसरी । झुंज न्यूज : महिला बचत गटसारखी संकल्पना ज्यातून ‘चुल आणि मुल’ या संकल्पनेच्या बाहेर येऊन राज्यातील महिला सक्षम होतांना आपल्याला बघायला मिळत आहेत. त्याला बळ देण्याचे काम ‘‘इंद्रायणी थडी’’ यात्रेमधून आमदार महेश लांडगे या भावाने केले. त्यामुळे राज्यातील सर्व मातृशक्ती लांडगे यांच्या पाठीशी आहे, असे गौरोद्वागर भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी काढले.
आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने भोसरीतील गावजत्रा मैदानावर सुरू असलेल्या इंद्रायणी ‘‘थडी- २०२३’’ महोत्सवाला चित्रा वाघ यांनी भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पुजा लांडगे यांच्याहस्ते त्यांचा प्रभू श्रीराम मूर्ती देवून सन्मान करण्यात आला.
चित्रा वाघ म्हणाल्या की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ‘नारी शक्तीचा’ सन्मान केला जात आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘‘इंद्रायणी थडी’’ महोत्सवाची सुरूवात झाली. त्याचा मला आनंद होत आहे.
“या कार्यक्रमात १० लाखांपेक्षा अधिक लोक येऊन गेली आहेत. तसेच, आगामी तीन दिवसांत आणखी गर्दी होणार आहे. तसेच देशातील पंतप्रधान मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे -फडणवीस सरकार महिलांना सुरक्षित ठेवण्याचे काम करीत आहे. त्यामुळेच या मातृशक्तीचं कौतुक, गौरव करण्याचे काम महेश लांडगे करीत आहेत, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
महेशदादांच्या घरीपण नारीशक्तीचा दबदबा…
नारीशक्तीचा दबदबा सर्वत्र आहे. महेशदादांच्या घरीपण हा दबदबा कायम आहे. ‘‘पूर्वी महेशदादा हजार लोकांत उठून दिसत होते. पैलवान भरभक्कम दादाला आमच्या पुजा वहिनींनी डायटिंग करायला लावले आहे. पण, आमचा दादा असाच पैलवान असला पाहिजे..जबरदस्त…म्हणून मला वाटते की, मातृशक्तीचा दबदबा दादांच्या घरापर्यंत पोहोचला आहे.’’ अशी मिष्कील टिपण्णी चित्रा वाघ यांनी केली. त्यामुळे व्यासपीठावर आणि कार्यक्रमस्थळी हशा पिकला.
बचत गटांच्या उत्पादनांचा घेतला आस्वाद…
दरम्यान, रात्री उशीरापर्यंत विविध कार्यक्रमांचा चित्रा वाघ यांनी आनंद घेतला. मनोरंजनाच्या कार्यक्रमस्थळी त्यांनी गीत गायनही केले. तसेच, महोत्सवातील सुमारे ४०० स्टॉलला प्रत्यक्ष भेट दिली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिला बचतगटांच्या प्रतिनिधींची आस्थेने विचारपूस केली आहे. काही अडचणी आहेत का? असे विचारुन आयोजनकांना काही सूचनाही केल्या. यासह स्टॉलवरील उत्पादनाचा आस्वादही घेतला.