पुणे I झुंज न्यूज : अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती आयोजित राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे आयोजन लाल महालात करण्यात आले होते. या वेळी रत्नाबाई घोरपडे, शीतल अमराळे, शोभा तेलंग, छाया चौधरी, स्वाती बोडके, अलका खडके, मीना सैद, सुमन अरसूळ, भागाबाई आइवळे, सुरेखा जगताप यांना आदर्श मातापुरस्कार, राखी कोकाटे, लता राजगुरू, पूजा झोळे यांना कर्तृत्ववान महिला सन्मान, शकीला इनामदार यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, ज्योती ढामाळ यांना महाराणी ताराराणी पुरस्कार व अस्मिता राजेंद्र जगताप-कदम यांना राजमाता जिजाऊ पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
जिथे शिवस्वराज्याची ठिणगी पेटली त्या लाल महालात सालाबादप्रमाणे मोठया उत्साहात जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजे असे स्वराज्याचे दोन छत्रपतींना घडविविणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंमुळेच हे स्वराज्य अठरापगड बारा बलुतेदारांच्या जीवावर उभे राहिल.. गेली साडेतीनशे वर्ष या मातेचा आदर्श माता असा सन्मान या महाराष्ट्रात होत आहे. राष्ट्रमाता जिजाऊंचा आदर्श घेऊन आजच्या एकविसाव्या शतकात अनेक महिला आपल्या मुला-मुलींना संस्काराची शिदोरी देत आहेत. या संस्कारांमुळेच त्यांच्या मुलांनी शून्यातून आपलं विश्व उभे केले आहे. ज्या पुण्याला राजमाता जिजाऊ यांनी वसविले, त्या पुण्याचे नाव जिजाऊनगर अथवा जिजापूर असे करण्यात यावे असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर यांनी केली.
महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर असे केले, उस्मानाबाद चे धाराशिव केले. नगर चे आता अहिल्याबाई होळकर असे नामकरण होत आहे . पुण्यातील पुणे युनिव्हर्सिटी त्या सावित्रीबाई फुले असे नाव देण्यात आले आहे . त्याच धर्तीवर पुणे शहराचे जिजाऊनगर किंवा जिजापूर पुणे हे मा. मुख्यमंत्र्यांनी किंवा मा. उपमुख्यमंत्र्यांनी केले पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर यांनी केली.
कार्यक्रमासाठी मा. आमदार चंद्रकांत मोकाटे, मा.दीपकभाऊ मानकर, ऍड.मिलिंद पवार, ज्ञानेश्वर मोळक, कैलास वडघुले, विठ्ठलराव जाधव उपस्थित होते. राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेच्या धनादेशाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन मराठा सेवा संघ पुणे शहर अध्यक्ष प्रशांत धुमाळ, सचिव अक्षय रणपिसे, निलेश इंगवले, मुकेश यादव, मंदार बहिरट, युवराज ढवळे, मनीष काळे यांनी केले. सुत्रसंचालन विराज तावरे यांनी केले तर सोनाली मारणे यांनी आभार मानले.