पिंपरी I झुंज न्यूज : बलाढय शत्रूंचा सामना करून त्यांना आस्मान दाखवण्याचे काम छत्रपती संभाजी महाराज यांनी केले आहे. त्यांचे कर्तृत्व पाहता त्यांना स्वराज्यरक्षक ही उपाधीच योग्य, मानाची आणि बहुजनांसाठी अभिमानाची आहे. स्वराज्यरक्षक या मध्येच धर्म रक्षण, सर्वसामान्यांची एकजूट, महिलांचा सन्मान न्याय आदींसह अनेक मानवतावादी गोष्टींचा समावेश आहेच. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांना स्वराज्यरक्षक हे संबोधन त्यांच्या कर्तुत्वाला साजेसे असल्याचे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केले.
छत्रपती शिवरायांनी सर्व जाती धर्माच्या लोकांची एकजूट करून स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्यामध्ये अन्यायाला थारा न्हवता. शिवरायांच्या स्वराज्यामध्ये शेतकरी, महिला, सर्वसामान्य जातीतील माणसांचा देखील सन्मान केला जात होता. अन्याय करणाऱ्या शत्रूची जात धर्म न पाहता निष्ठावान मावळ्यांच्या बळावर शत्रूंवर मात करत शिवरायांनी स्वराज्य निर्मिती करून त्याचे रक्षण केले.
शिवरायांच्या विचारांनी प्रेरित होऊन छत्रपती संभाजीराजे यांनी वाटचाल केली. कमी वयात आक्रमकपणे शत्रूवर चाल करून लढाया जिंकण्याचा विक्रम संभाजीराजेंनी केला आहे. मात्र काही लोक त्यांच्याविषयी चुकीची माहिती पसरवून त्यांना मर्यादित ठेवण्याचे काम करत आहेत. संभाजीराजेंचा केवळ धर्मवीर असा उल्लेख करणे हे त्यांना मर्यादित ठेवण्यासारखे आहे. स्वराज्यरक्षक या उपाधीमध्ये धर्माचे रक्षण हा मुद्दा देखील समाविष्ट होतोच. त्यामुळे संभाजीराजे हे स्वराज्यरक्षकच आहेत, असे काळे म्हणाले.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजीराजेंना धर्मवीर ऐवजी स्वराज्यरक्षक म्हणावे असे सांगितल्यानंतर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी गरळ ओकायला सुरुवात केली आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा ‘सहा सोनेरी पाने’ व हिंदूपत पातशाही या दोन पुस्तकात अतिशय बदनामी कारक लिखाण करणाऱ्या वि दा सावरकर यांना भाजपावाले गुरु मानतात. हे विरोधाभासी आहे.
छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजीराजेंचा अवमान करणाऱ्यांची प्रतिमा सर्वात अगोदर लावून नमन करणाऱ्यांनी छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजीराजेंना काय संबोधन वापरावे हे सांगू नये. छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी भाजपाला कळवळा नाही. जर असेल तर महापुरुषांच्या यादीत छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव समाविष्ठ करून तसे जाहीर करावे. राज्यात व केंद्रात त्यांचे सरकार आहे. त्याचा अधिकार वापरून ही मागणी पूर्ण करावी अशी मागणी सतीश काळे यांनी केली आहे.