शिरूर I झुंज न्यूज : तळेगाव ढमढेरे ( ता.शिरूर) येथे ‘पाचुंदा’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी आई-वडीलांविषयी असणारी कृतज्ञता व्यक्त करताना, कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणाला मेनका, उर्वशी, रंभा दिसते, पण मला डोळे झाकताच उन्हात राबणारी माय दिसते. असे काव्यस्वरूपात प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांनी केले.
तळेगाव ढमढेरे ( ता. शिरूर) येथील शिक्षक भवन येथे रविवारी ( दि. ११) रोजी श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या निमगाव म्हाळुंगी (ता.शिरूर) येथील श्रीमती बबईताई टाकळकर माध्यमिक आश्रमशाळेतील मा. मुख्याध्यापक स्व. दिनकर धुमाळ सर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून त्यांच्या स्वलिखित कवितांच्या ‘पाचुंदा’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी आमदार सूर्यकांतकाका पलांडे हे होते. पाचुंदा हा कवितासंग्रह निखिल दिनकर धुमाळ व श्रध्दा दिनकर धुमाळ यांनी संपादित केला असून सुप्रसिद्ध लेखक प्रा. कुंडलिक कदम यांनी प्रस्तावना लिहिली आहे.