पिंपरी | झुंज न्यूज : मूळ शिवसेनेचे कामगार नेते इरफान सय्यद यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत (शिंदे गट) ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत आज (ता.१३ नोव्हेंबर) प्रवेश केला. तर, दुसरीकडे उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमधीलही ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक शिवसैनिकांनी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पिंपरीत मोठे खिंडार पडले आहे.
सय्यद हे महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि राज्याच्या कामगार सल्लगार समितीचे सदस्य आहेत. या कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही मूळ शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. त्यांना लगेच उपनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आनंद आश्रम, टेंभी नाका येथे हा प्रवेश झाला. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सय्यद यांचे स्वागत केले. बाळासाहेबांच्या शिवसेनेचा अल्पसंख्याक चेहरा म्हणून सय्यद यांच्याकडे पाहिले जाते. म्हणून त्यांच्याकडे अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
दुसरीकडे खासदार बारणे यांच्या शहरातील थेरगाव निवासस्थानी शहरातील शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनीही आज बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. खा. बारणे शिंदे गटात गेल्यानंतर त्यांच्यामागे मावळमधून तसेच शहरातून काही मोजके पदाधिकारी शिंदे शिवसेनेत गेले होते. त्यानंतर आजचा प्रवेश झाला. हळूहळू आणखीही असे प्रवेश होतील,असे खा.बारणे यांनी आजच्या प्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असे ते म्हणाले. बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख राजेश वाबळे यांच्या पुढाकाराने हे प्रवेश झाले. पक्षाचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, मावळ तालुकाप्रमुख राजू खांडभोर आदी यावेळी उपस्थित होते. प्राध्यापक दत्तात्रेय भालेराव, अनिकेत पाटील, मोहन चौधरी, नरेश ठाकूर, सुनीता बांबळे, माधुरी ताटकर, रुपेश चांदेरे शाखाप्रमुख नरेश टेकाडे, विभागप्रमुख शिवसेना प्रीतम बोत्रे, सामाजिक कार्यकर्ते अमित गुंजाळ, दीपक जाधव, जरीना सिद्दिकी आदींचा त्यात समावेश आहे.