मुंबई I झुंज न्यूज : प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आता भाजप आणि शिंदे गटालाही धक्का देण्याच्या तयारी आहेत. आमची बांधिलकी शिंदे गट आणि भाजपशी आहे. पण येणाऱ्या निवडणुकीत आमची युती कुणाशीही होऊ शकते, असं मोठं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. बच्चू कडू यांनी थेट शिंदे गट आणि भाजपला धक्का देणारं विधान केल्याने त्याचे अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच आगामी निवडणुकीती किती जागा लढवायच्या याचा अभ्यास सुरू केल्याचंही त्यांनी सांगितलं.
बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे मोठं राजकीय विधान करून खळबळ उडवून दिली आहे. आतापासून जागा निवडणार नाही. आम्ही सहा महिने अभ्यास करतोय.10 ते 15 जागांवर आम्ही लढण्याच्या तयारीत आहोत. आम्ही लढणार याची भीती भाजपलाच नाही, ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही असू शकते, असं बच्चू कडू म्हणाले.
आमची युतीही होऊ शकते. आमची कुणाही सोबत युती होऊ शकते. हे कुठे स्थिर राहतील का? पाच वर्षाचं राजकारण पाहिलं तर सत्तेत कोणता पक्ष नव्हता असं काही सांगता येत नाही. सर्व पक्ष सत्तेत येऊन गेले. एकही पक्ष विरोधात राहिला नाही, असं त्यांनी सांगितलं. 24 पक्षांचं दिल्लीत सरकार होतं. राजकारणात एक आणि एक अधिक दोन होत नाही. ते शून्यही होतं. एक आणि एक चारही होतं. राजकारणात अंत पाहिला जात नाही. कुणी पाहूही नये. तो मुर्खपणा ठरेल. राजकारणाचा तळ शोधता येत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, असं ते म्हणाले.
आमची सध्या बांधिलकी शिंदे गट आणि भाजप सोबत आहे. पुढे या गोष्टी सर्व कशा समोर येतील ते पाहू. झुकतं माप शिंदे गट आणि भाजपलाच राहील. यांच्यासोबत राहिलो तर यांच्यासोबत राहू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
रवी राणांच्या मागे कोण हा विषयच नाही. त्यांनी वाद मिटल्याचं सांगितलं. नंतर सांगितलं वाद मिटला नाही. घरात जाऊन मारू, असं ते म्हणाले. आता पुन्हा सांगतात वाद मिटला नाही. यामुळे त्यांच्या मागे कुणी नाही. ते स्वत:च स्वत:च्या मागे आहेत, असं त्यांनी सांगितलं.
“मला ठाकरेंनी मंत्री केलं. तसेच आम्हीही त्यांना मुख्यमंत्री केलं. तुम्ही एकतर्फी विचार करू नका. प्रत्येक मत फार महत्त्वाचं आहे. आमच्या मतामुळे ते मुख्यमंत्री झाले हे विसरु नका. त्यांनी शब्द पाळला. मंत्री केलं त्याबद्दल त्यांचे आभार आहे. शिंदे साहबेच आम्हाला तिकडे घेऊन गेले होते, अशी माहिती त्यांनी दिली.