पुणे I झुंज न्यूज : विवाहित असतानाही तरुणींशी संबंध ठेवणारा, तसेच घटस्फोट झाला नसतानाही एका महिला पोलीस शिपायाला विवाहाबाबत विचारणा करणाऱ्या पोलीस शिपायाला पुणे शहर पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत नथू रोकडे असे बडतर्फ केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. रोकडे याची वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली होती. रोकडे याच्याविरुद्ध २ जानेवारी २०२१ रोजी औरंगाबाद पोलीस दलातील कन्नड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रोकडे याचा ६ मे २०१८ रोजी विवाह झाला होता. विवाहानंतरही तरुणींशी प्रेमसंबंध ठेवून समाजमाध्यमावरुन संदेश पाठविणे, तसेच घटस्फोट झालेला नसताना त्याने पोलीस मुख्यालयातील एका महिला पोलीस शिपायाकडे विवाहाबाबत विचारणा केली होती. त्याने पत्नीचा विश्वासघात केला. पत्नीला लोणावळा येथे फिरायला नेऊन तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
या प्रकरणी रोकडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्याची विभागीय चाैकशी करण्यात आली. तो चौकशीसाठी फक्त एकदा उपस्थित राहिला. चाैकशीत त्याने सहकार्य केले नाही. एकतर्फी चौकशीत रोकडे याच्या कृतीमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी त्याला पोलीस दलातून बडतर्फ करण्याचे आदेश दिले.