पिंपरी I झुंज न्यूज : मावळ लोकसभा मतदारसंघातील उरण तालुक्याचाच एक भाग असलेल्या घारापुरी बेटावर एकूण तीन गावे आहेत. त्यासाठी घारापुरी बेटावर पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. ही योजना सुमारे 17 कोटी 60 लाख रुपयांची असून या निर्णयाला लवकरच मंत्रीमंडळाची मान्यता घेतली जाईल, असे आश्वासन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्याची माहिती मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. वनखात्याच्या परवानगीमुळे मावळातील पाणीपुरवठ्याची रखडलेली कामेही मार्गी लागणार आहेत. त्याबाबत लवकरच वन विभाग आणि जिल्हाधिका-यांसोबत बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जल जीवन मिशन अंतर्गत मावळ लोकसभा मतदारसंघातील पाणी पुरवठा योजनेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी खासदार बारणे यांच्या पुढाकाराने मंगळवारी (दि.11) मुंबईत बैठक झाली. या बैठकीत मंत्री पाटील यांनी मावळ मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सद्यस्थितीत चालू असलेल्या आणि भविष्यातील पाणीपुरवठा संदर्भातील कामांचा आढावा घेतला. कामे तत्काळ मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी अधिका-यांना दिले. खासदार श्रीरंग बारणे, मावळचे आमदार सुनील शेळके, विभागाचे प्रधान सचिव संजय जयस्वाल, मुख्य अभियंता राजेश निघोट, चंद्रकांत गजभिये, राजेंद्र राहाणे, कार्यकारी अभियंता विजय सुर्यवंशी, प्रकाश खताळ, रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर, पुणे विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली आवटे, उपअभियंता मनीषा पवार बैठकीला उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”उरण तालुक्याचाच एक भाग असलेल्या घारापुरी बेटावर एकूण तीन गावे आहेत. त्या गावांना पाण्याची मोठी समस्या आहे. त्यासाठी घारापुरी बेटावर 17 कोटी 60 लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे तीनही गावांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्याचबरोबर जल जीवन मिशन अंतर्गत मतदारसंघात पाणीपुरवठ्याची विविध कामे सुरु आहेत. त्यामध्ये कार्ला, वाढीव डोंगरगाव, कुसगाव, डोणे, आढळे नळ पाणीपुरवठा योजना, खडकाळे, कामशेत, पाटण आणि आठगावे पाणीपुरवठा योजनेअंतर्गत कामे मंजूर झाली आहेत. त्यातील काही कामे सुरु आहेत. परंतु, वनखात्याच्या जागेतून काही कामे जाणार आहे. वन खात्याची परवानगी नसल्याने ती कामे प्रलंबित असल्याकडे पाणीपुरवठा मंत्र्यांचे लक्ष्य वेधले. याबाबत लवकरच वन विभागाचे अधिकारी आणि जिल्हाधिका-यांसोबत बैठक घेतली जाईल. त्यातून सकारात्मक मार्ग काढण्याचे” आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले.
मावळातील पाणीपुरवठ्याच्या कामांना गती
कर्जत, खालापूर, उरण आणि मावळ या ग्रामीण भागासाठी सुरु असलेल्या पाणीपुरवठा योजनेतील कामांचाही आढावा घेतला. त्या अंतर्गतची कामे तत्काळ मार्गी लावण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले आहेत. मावळ मतदारसंघातील पाणीपुरवठ्याच्या कामांना वेग मिळाला आहे. राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आहे. या सरकारच्या काळात झपाट्याने कामे होत आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून मतदारसंघात विविध कामे सुरु आहेत. त्या कामांना गती मिळाली असल्याचे खासदार बारणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.