“कोरोनाच्या काळात मंदिरं उघडा म्हणून आंदोलने झाली,पण शाळा उघडा म्हणून कोणी टाहो फोडला नाही. शिक्षण ह्या विषयाकडे आपण किती गंभीरपणे पाहतो याची ती अनुभूती होती.मात्र… आजही ह्या विषयाकडे गांभीर्याने पाहणारी एक युवा पिढी आहे याचा आनंद झाला. महाराष्ट्र पोलीस दलात असणारा आमचा माजी विद्यार्थी देवेंद्र उकिर्डे हे त्याचे एक मूर्तिमंत उदाहरण….!
इ.१२ वी पर्यंत देवेंद्र ह्याच विद्यालयात शिकला. शालेय जीवनात अत्यन्त नम्र ,चौकस, संवेदनशील व धडपड्या असा हा आमचा लाडका विद्यार्थी. भाषणाची त्याला विशेष आवड. मी सुरू केलेल्या ‘ विद्यार्थी संसद’ ह्या उपक्रमात त्याची भाषण लक्षपूर्वक ऐकायचो व मला पण ह्या शिष्याकडून प्रेरणा मिळायची. पुढे तो पोलीस दलात भरती झाला. आता मुंबई पोलीस दलात उत्तम काम करतो. जनसंपर्क हा त्याचा आवडता छंद.
आज सहज बोलणे झाले. शाळेविषयी विचारणा केली. आम्ही सुरू केलेल्या ‘ विद्याधाम अभ्यासिकेविषयी’ विचारणा केली. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांविषयी विचारले. खर तर आमच्या अभ्यासिकेत असणारी सर्व मुले जाणीवपूर्वक चिकाटीने प्रयत्न करतात हे मी आवर्जून सांगितले. तो स्वतः पोलीस दलात असल्याने एक दिवस येऊन त्यांना भेटण्याविषयी मी सुचविले. नक्की येण्याचे देवेंद्रने कबूल केले.
स्वतः पोलीस झालो, तरी हे मित्र पोलीस झाले पाहिजेत असे त्याला वाटले. आजपर्यंत अनेक दिलदार व शिक्षणाविषयी आस्था असणाऱ्या सुजनांनी पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत, हे मी सांगितले. मात्र, आता बाजारात नवीन प्रकाशनाची पुस्तके आली की ती आम्ही खरेदी करणार आहोत हे सांगितले. त्यावर लगेचच देवेंद्र म्हणाला, की ती मी जबाबदारी घेतो सर….! खूप आनंद झाला.
देवेंद्र म्हणाला,” सर, मी आत्ता तुम्हांला १०,०००/-(दहा हजार रुपये) पाठवितो, त्यातून त्या मित्रांना जी पुस्तके खरेदी करायची असतील ती करू द्या..”….क्षणभर मला काही सुचेना. देवेंद्रचा हा दिलदारपणा, युवा मित्रांविषयीची तळमळ, नाविन्याचा ध्यास ,आमच्यावर असणारा विश्वास, सामाजिक बांधिलकी ह्या सर्व गुणांचे मनोज्ञ दर्शन झाले… युवा पिढीचा हा प्रतिनिधी पहिल्यापासून मनात घर करून होताच,आणि आता तर त्याच्या कृतीने त्याचे हृदयातील स्थान अधिकच अढळ झाले… शालेय जीवनातील त्याच्या आठवणी मनात रुंजी घालत असतानाच, मोबाईलवर संदेश आलाही….’ सर,पैसे पाठविलेत, युवा मित्रांना शुभेच्छा सांगा व खूप अभ्यास करा म्हणावं..यशवंत व्हा !’….डोळ्यांत पाणी तरारले क्षणभर..१०,००१ (दहा हजार एक रुपये ) होते ते सर्वांच्या लेखी…माझ्या लेखी मात्र.. अपार माया, दृढ विश्वास आणि नितांत श्रद्धा !!…धन्यवाद देवेंद्र…
प्राचार्य अनिल शिंदे,
विद्याधाम, कान्हूर मेसाई.