पिंपरी I झुंज न्यूज : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमएसआरडीसी) प्रस्तावित केलेल्या वर्तुळाकार रस्त्यासाठी एकूण १७४० हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. त्यात सर्वाधिक १६०१ हेक्टर क्षेत्र खासगी आहे. विशेष म्हणजे या रस्त्यासाठी लष्कराची जागा कुठेही घ्यावी लागणार नाही. भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाकडून १७२ कि.मी. लांबीचा आणि ११० मी. रुंदीचा रस्ता केला जाणार आहे.
हा प्रकल्प पूर्व आणि पश्चिम अशा दोन विभागांत विभागण्यात आला आहे. पूर्व भागात मावळ तालुक्यातील ११ गावे, खेडमधील १२ गावे, हवेलीतील १५, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांचा समावेश आहे, तर पश्चिम भागात भोरमधील पाच, हवेलीतील ११, मुळशीतील १५ आणि मावळ तालुक्यातील सहा गावांचा समावेश आहे. मावळ, मुळशी, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या तालुक्यांमधून हा प्रकल्प प्रस्तावित आहे.
मावळ, मुळशी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत एकूण ५६४ हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. त्यात खासगी ५२०.३२ हे., गायरान जमीन ०.२२ आर, वन विभागाची २३.५२ हे., तर इतर विभागांची २०.४० हे. क्षेत्र संपादित केले जाणार आहे. हवेली उपविभागीय अधिकारी खासगी ४८५.८९ हे., गायरान ८.२७ हे., वन जमीन ६२.८० हे. आणि इतर विभागांची ६.८५ हे. क्षेत्र संपादित होणार आहेत. भोर उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत खासगी १५९.२२ हे., वन जमीन २.३३ हे. संपादित होणार आहे. पुरंदर उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत १४६.९० हे. क्षेत्र खासगी आणि वन विभागाची ३.५६ हे. संपादित होणार आहे. खेड (राजगुरुनगर) उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत खासगी २८८.९५ हे., गायरान जमीन ३.८ हे. आणि इतर विभागाची साडेआठ हे क्षेत्र संपादित होणार आहे.
प्रकल्पबाधितांना अधिक मोबदला
मावळ, मुळशी, हवेली, भोर, खेड आणि पुरंदर तालुक्यांतून पूर्व आणि पश्चिम वर्तुळाकार रस्ता जात आहे. या प्रकल्पात ८३ गावे बाधित होणार आहेत. त्यातील ७७ गावांतील मोजणी पूर्ण झाली आहे. भूसंपादनासाठी आवश्यक पहिल्या टप्प्यातील २५० कोटी रुपये मंजूर झाले असून हा निधी प्राप्तही झाला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यात चालू बाजार मूल्यदर (रेडीरेकनर) दर, गेल्या पाच वर्षांत झालेले व्यवहार, या भागातील अन्य प्रकल्पाला दिलेला दर यापैकी जो अधिक असेल तो दर दिला जाणार आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
प्रकल्पाचा आढावा
८४ पैकी ७७ गावांतील मोजणी पूर्ण
खासगी जागा १६०१.२९ हे., शासकीय जागा ११.५७ हे.
वन विभागाची जागा १४७.५२ हे.
शासनाकडील उपलब्ध जागा ३५.७४ हे.
प्रकल्पांची लांबी १७३.७३ कि.मी. (पूर्व ६८.८ कि.मी., पश्चिम १०४.९ कि.मी.)
प्रकल्पाची किंमत ३९,३७८.७८ कोटी रुपये