पुणे I झुंज न्यूज : आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय यांच्या 250 व्या जयंती वर्ष निमित्त सांस्कृतीक मंत्रालय, भारत सरकार, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या अर्थसहाय्यातून उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, ग्रंथालय संचालनालय, मुंबई शासकीय विभागीय ग्रंथालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच महिला सक्षमीकरण जनजागृती रॅलीचे आयोजन सारस बाग ते शासकीय विभागीय ग्रंथालय, शनिवार पेठ, पुणे येथे पर्यंत करण्यात आले होते.
सदर “महिला सक्षमीकरण शालेय मुलींची जनजागृती रॅली” चे उद्घाटन मा. श्री. राजेंद्र मुठे, उप आयुक्त, मालमत्ता व व्यवस्थापन, पुणे महानगरपालिका यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
यावेळी ते म्हणाले, स्त्री सक्षमीकरण हा आजचा स्वतंत्र विषय मानला जातो. समानता आणि सर्वांगीण विकासासाठी स्त्री सक्षमीकरण गरजेचे असल्याचे सांगितले. भारतात महिला अजूनही दुय्यम स्थानावरती मानल्या जातात व त्या आर्थिक व सामाजीक दृष्ट्या दुर्बल व निर्भर असल्याचे सांगितले.
वर्तमान स्थितीत स्त्रीयांमध्ये शिक्षण व तत्सम कारणांमुळे जागृकता वाढत चालली आहे असे सांगून आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय यांच्या 250व्या जन्म वर्ष निमित्त आयोजित रॅलीला शुभेच्छा देऊन हिरवा झेंडा दाखवून सुरवात केली. ही रॅली सारस बाग येथून सुरू होऊन पुरम चौक मार्गे बाजीराव रोडने नातुबाग चौक, शनिपार चौक, आप्पा बळवंत चौक, शासकीय विभागीय ग्रंथालय, शनिवार पेठ, पुणे येथे रॅलीची सांगता करण्यात आली. सांगता कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पुजन व राजा राममोहन रॉय यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार व दिपप्रज्वलन करुन करण्यात आली. यावेळी सुप्रसिध्द लेखिका श्रीमती माधवी कुंटे, श्री. दत्तात्रेय क्षीरसागर, सहाय्यक ग्रंथालय संचालक, श्री. सुरेश रिद्दीवाडे, ग्रंथपाल गट-अ, श्रीमती श्रेया गोखले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी हे उपस्थित होते.
यावेळी श्रीमती गोखले यांनी मार्गदर्शन करताना स्त्री ही पूर्वीपासून सक्षम असून त्यांचे स्वरुप आपल्याला देवींमध्ये आढळून येते. आजच्या भाषेत बोलायचे म्हटले तर शिक्षण खाते हे सरस्वती देवीकडे, संरक्षण खाते दुर्गा माताकडे, अर्थ खाते लक्ष्मी माताकडे तसेच छत्रपती शिवाजी महराज यांना घडविण्यामध्ये जिजामाता या सशक्त स्त्रीचे खूप मोठे योगदान असून आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री ही सक्षम झालेली दिसून येते.
सुप्रसिध्द लेखिका श्रीमती माधवी कुंटे यांनी महिला सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन करताना राजा राममोहन रॉय हे एक भारतीय समाज सुधारक होते. राममोहन रॉय यांना मुघल सम्राट दुसरा अकबर याने राजा ही पदवी बहाल केली. त्यानंतर ते राजा राममोहन रॉय या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी मूर्ती पुजेवर कडाडून टिका केली. यांच्या वहिनींना त्यांच्या भावाच्या मृत्यू पश्चात सती जावे लागले होते व त्यामुळे समाजातील त्याकाळी सुरू असलेली सतीची चाल बंद करण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम अतोनात प्रयत्न करुन 1829 साली इंग्रज सरकारला सतीची चाल बंद करण्यास भाग पाडले. त्याच बरोबर त्यांनी आजच्या आधुनिक जगात स्त्रीया स्वत:च्या नावावर बँकेकडून बचत गट स्थापन करुन कर्ज घेऊन स्वत:चे व्यवसाय सुरू करुन कुटूंबाच्या व राष्ट्राच्या प्रगतीस मोलाचे योगदान करत आहेत.
प्रमुख उपस्थित मा. श्री. दत्तात्रेय क्षीरसागर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ज्ञानेश्वरीतील ताठीचे अभंगांचे उद्हारण देत ज्ञानेश्वर महाराज नैराश्यात गेल्यानंतर बंद खोलीत एकटे बसले असताना त्यांना मुक्ताबाईंनी दार उघडण्यासाठी ताठीचे अभंग गाऊन नैराश्यातून बाहेर काढले होते असे सांगीतले. तसेच राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथेस प्रतिबंध, मालमत्तेबाबत महिलांना समान अधिकार, विधवांना पुन:विवाह हक्क मिळणे, महिलांसाठी शिक्षण, बहुपत्नीक व बाल विवाहस प्रतिबंध या बाबत थोडक्यात माहिती दिली.
सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सुरेश रिद्दीवाडे यांनी केले. या रॅलीमध्ये सेंट हिल्डाज मुलींची शाळा, जिजामाता मुलींची शाळा, नू. म. वि. मुलींची शाळा, ठाकरसी कन्याप्रशाला, सुदराबाई राठी मुलींची शाळा या शाळेतील शिक्षक वृंद व विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. या रॅलीमध्ये शालेय शिक्षक, विद्यार्थिनी, अधिकारी व कर्मचारी व सभोवतालीन नागरिक असे मिळून सुमारे 350 जनसमुदाय उपस्थित होते.