ज्येष्ठ पत्रकार एस.एम देशमुख यांनी दिला ‘त्या’ जुन्या आठवणींना उजाळा
मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठीचे आंदोलन आमच्यासाठी जिव्हाळ्याचा आणि प्रतिष्ठेचा विषय बनले होते.. आम्ही महामार्गाच्या चौपदरीकरणाचा विषय हाती घेतला तेव्हा सारेच आम्हाला वेड्यात काढत होते..” देशमुख तुम्ही खडकावर डोके आपटून घेत आहात, चौपदरीकरण वगैरे काही होणार नाही, तुम्ही या भानगडीत पडू नका” असा सल्ला काहीजण देत होते तर “आंदोलन करणं हे काय पत्रकारांचं काम आहे का? तुमच्या लेखणीची ताकद कमी झाली की ती बोथट झाली म्हणून तुम्हाला रस्त्यावर उतरावे लागत आहे” असे टोमणेही काही जण मारत होते.. काहींना मुंबई – गोवा महामार्गापेक्षा ” रेवस ते रेडी” सागरी महामार्गाची जास्त चिंता लागून राहिली होती..” सागरी महामार्गासाठी लढा उभारा” असे अनाहूत सल्ले काही हितसंबंधी देत होते.. एका बाजुला मानसिक खच्चीकरणाचे हे पांढरपेशे प्रयत्न सुरू होते तर दुसरया बाजुनं आमच्या आंदोलनाची दखलच घ्यायची नाही असा निर्धार राजकीय पक्ष, समाज आणि काही सामाजिक संघटनांनी केला होता.. म्हणजे पत्रकार एकटे पडले होते.. त्यामुळे आमच्यासाठी ही लढाई पूर्ण होईस्तोवर लढणे अनिवार्य झाले होते.. अन्यथा आमचं हसं होणार हे ठरलेलं होतं. .
त्यामुळे कोणत्याही टिका – टिप्पणीकडे लक्ष न देता, न थकता सतत सहा वर्षे तन, मन, धनानं आम्ही ही लढाई लढत राहिलो .. २ ऑक्टोबर २००६ रोजी वडखळ नाक्यावर आम्ही गांधीगिरी केली..सर्व वाहन चालकांना गुलाबपुष्प आणि विषयाचं गांभीर्य पटवून देणारे निवेदन देऊन आम्ही या विषयाकडे जनतेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला..पहिलंच आंदोलन प्रचंड यशस्वी झालं.. जिल्ह्यातील ३०० पेक्षा जास्त पत्रकार रस्त्यावर उतरले होते.. मात्र पत्रकारांचं हे आंदोलन हिंसक करायचं, गाड्यांवर दगडफेक करायची जेणे करून पत्रकारांवर लाठीचार्ज होईल आणि त्याचं राजकीय भांडवल करीत गंमत बघत बसायची ही योजना आखून काही समाजकंटक आणि गुंडांना आंदोलनात घुसविले गेले होते..सुदैवाने याचा सुगावा मला लागल्यानंतर तेथे उपस्थित पोलीस अधिकार्यांना मी याची कल्पना दिली.. त्यांनी योग्य ती काळजी घेतली.. नंतर हे आंदोलन शांततेत पार पडलं पण हा अनुभव लढा लढताना किती जोखीम आहे याची जाणीव करून देणारा होता..थोडी चूक देखील महागात पडू शकते हे स्पष्ट होतं.. पुरेशी काळजी घेणं अगत्याचं होतं.. या अनुभवापासून बोध घेत काही निर्णय आम्ही घेतले.. “आंदोलन शांततेच्याच मार्गानंच पुढं न्यायचं..काही झालं तरी दगड उचलायचा नाही”.. हे तत्व सर्वांनी मान्य केलं.. त्यानंतर आंदोलनात सहभागी होणारया पत्रकारांना ओळखपत्र द्यायचं, जेणे करून कोण आपला, कोण परका याची ओळख पटेल.. तयारी, योग्य ती काळजी घेतच आंदोलनं करायची असं ठरल्यावर दर दोन – तीन महिन्याला वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या पध्दतीने आम्ही आंदोलनं करीत गेलो.. 2 ऑक्टोबरला गांधीगिरी केल्यानंतर मग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे, उपोषणं, घंटानाद, फणसाड अभयारण्यात मानवी साखळी, पळस्पे ते पोलादपूर लॉंगमार्च, वडखळ ते पेण पदयात्रा, पळस्पे ते वर्षा कार रॅली, चिपळूणमध्ये मशाल मार्च, वडखळ नाक्यावर स्ट्रीट प्ले,अधिकारयांना घेराव, पळस्पे ते पोलादपूर मार्गावर ठिकठिकाणी रस्ता रोको, आझाद मैदानावर उपोषण, खेड नाक्यावर धरणे आंदोलन, अशा सर्व आयुधांचा वापर करीत आम्ही ही लढाई लढली..जिद्द, सातत्य, एकजूट आणि शांततेच्या मार्गानं चाललेल्या या लढयास यश तर मिळणारच होते.. तो योग तब्बल सहा वर्षांनी आला.. २०१२ ला अखेर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झालं.. . त्यानंतर आम्ही पेणला “विजय मेळावा” घेतला.. कोकणवासियांनी माझी उघड्या जीपमधून पेण शहरातून मिरवणूक काढली. .. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा दिवस होता.. सगळेच मित्र आनंदात होते.. पण हा आनंद चिरकाल टिकला नाही.. कारण २०१२ ला सुरू झालेले काम आज दहा वर्षे झाले तरी अपूर्ण आहे.. पळस्पे ते पात्रा देवी हे ४७५ किलो मिटरचे अंतर आहे.. हे काम दहा वर्षातही पूर्ण होत नसेल तर नक्कीच पाणी कुठं तरी मुरतंय..कोकण विकासाच्या या मार्गात आडवा येणारा झारीतील शुक्राचार्य कोण आहे याचा शोध कोकणी जनतेनं घेतला पाहिजे..
२०१३ मध्ये मी रायगड सोडले.. त्यानंतरही कोकणातील पत्रकार रस्त्यासाठी रस्त्यावर उतरले.. अगदी अलिकडे देखील पत्रकारांनी “खड्डे बुजवा आंदोलन” करून सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले.. पण उपयोग होत नाही..कारण कोकणाची “लाइफ लाईन” असलेला हा महामार्ग पूर्ण व्हावा अशी कोकणी नेत्यांचीच इच्छा नाही.. त्यामुळंच “आजही रस्ता लवकर पूर्ण करा” म्हणून एकही राजकीय पक्ष आक्रोश करताना दिसत नाही.. अगदी नितीन गडकरी यांनी देखील हात टेकले आहेत असंच चित्र आहे.. त्यामुळे वादे तर अनेकजण करतात मात्र मुंबई – गोवा महामार्ग कधी पूर्ण होईल हे ठामपणे कोणीच सांगू शकत नाही..अगदी नयायलयही.. कारण या विषयावर काही जनहित याचिका देखील न्यायालयात दाखल झाल्या पण विषय “जैसे थे” च आहे.. दीर्घकाळ रेंगाळले काम म्हणून या महामार्गाची गिनीज बुकात नोंद होऊ शकते..
पत्रकारांनी जनहिताचा एखादा विषय हाती घेतला, त्यासाठी सलग सहा वर्षे लढा दिला आणि अखेर तो विषय मार्गी लावल्याचे मराठी पत्रकारितेच्या इतिहासात असे अन्य कोणतेही उदाहरण नाही.. संयुक्त महाराष्ट्रच्या लढ्यात पत्रकार आघाडीवर होते तरी तो एकट्या पत्रकारांचा लढा नव्हता.. पत्रकार लढ्यात होते पण तो लढा जनतेचा होता.. कोकणातील महामार्गासाठीचा लढा हा केवळ पत्रकारांनी स्वतःच्या ताकदीवर आणि हिमतीवर उभारलेला लढा होता.. अनेकांना या लढया बद्दल कुतूहल यासाठी वाटत होतं की, दोन पत्रकार एकत्र येत नाहीत, त्यांचे विचार जुळत नाहीत इथं मात्र रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार एकत्र येऊन हा लढा लढत होते.. हा लढा पुढं नेण्यासाठी तीनही जिल्ह्यातील पत्रकारांनी माझ्यावर विश्वास दाखविला होता.. मला आठवतंय, चिपळूणला मशाल मार्च आंदोलन झाल्यानंतर सागरचे संपादक निशिकांत जोशी यांनी त्यांच्या प्रवाह या सदरात माझ्या तीन कॉलम फोटोसह माझ्यावर पानभर लेख लिहिला होता.. “मराठवाड्यातील पत्रकाराचा कोकणासाठी लढा” असा त्या लेखाचा मथळा होता.. एक संपादक दुसर्या आणि प्रतिस्पर्धी दैनिकाच्या संपादकाचा अशा पद्धतीनं गौरव करतो हे चित्र देखील कोकणी जनतेला पहिल्यांदाच दिसले… कोकणातील पत्रकारांचा हा विश्वास, साथ मला बळ देत होती.. आज निशिकांत जोशी नाहीत पण सागरचा तो अंक मी आजही जपून ठेवला आहे.. चिपळूणच्या मशाल मार्च आंदोलनात स्वतः निशिकांत जोशी देखील सहभागी झाले होते….
पत्रकार, अभिनेता विजय पवार यांनी आज सहा वर्षांच्या लढ्यातील काही फोटो मला पाठवले आणि सारा घटनाक्रम चलचित्राप्रमाणे माझ्या डोळ्यासमोरून सरकत गेला..
म्हणून या आठवणी..