शिरूर I झुंज न्यूज : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त कान्हूर मेसाई (ता.शिरूर) येथे आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉन स्पर्धेत संकेत जाधव विजेता ठरला. तर याच स्पर्धेत पोलिस भरतीचा सराव करणाऱ्या मंगेश नाणेकर याने पाच किलोमीटरचे अंतर केवळ १८ मिनिटांत पार करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
फक्कडमामा शिंदे व भाऊसाहेबमामा शिंदे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ठेवलेल्या चषकांनी या गुणवंतांना गौरविण्यात आले. कान्हूरच्या विघाधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पार पडलेल्या या स्पर्धेतचे उद्घाटन कक्ष अधिकारी अजय खडे, सदाशिव पुंडे यांनी केले.
कान्हूर व परिसरातील ७५ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. यावेळी शालेय विद्यार्थी व तरूणांसह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बमिगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने २२ सुवर्ण, १६ रौप्य, २३ कांस्यपदके मिळवली. या स्पर्धेतील गुणवंत खेळाडूंच्या सन्मानार्थ या स्पर्धा घेण्यात आल्याचे प्रा. अनिल शिंदे यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील तरूणांना मोठी गुणवत्ता आहे. त्यांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन केल्याचे स्पर्धेचे मुख्य आयोजक बबनराव शिंदे यांनी सांगितले. या स्पर्धेत संकेत जाधव यांनी विशेष नैपुण्यपद मिळविले. त्यांना गंगाधर पुंडे , मनोज शिंदे, अमोल पुंडे, बंडू पुंडे, बिभीषण मिडगुले, सुदाम तळोले यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.