आळंदी I झुंज न्यूज : आळंदी येथील वडगांव रस्त्यावर तनिषा उर्फ परी ही ४ वर्षाची चिमकुली शाळेतून तिच्या आजोबां सोबत दुचाकीवरून (एम.एच.१४ जे.जी.८०९२)घरी जात असताना भरधाव डंपरने (एम.एच.१४ बी.जे.२७५२) याने त्यांना धडक दिली. या अपघातात चार वर्षीय चिमकुलीचा मृत्यू झाला आहे.
आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना सोमवार दि.२५ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास वडगांव रस्त्यावरील गोशाळेजवळ घडली.तनिषा उर्फ परी विशाल थोरवे (वय४वर्षे रा. चऱ्होली खुर्द, थोरवेवस्ती ता. खेड जि. पुणे)असे मृत पावलेल्या चिमकुलीचे नाव आहे. तर आजोबा किसन एकनाथ थोरवे यांना गंभीर दुखापत झाली आहे.
याप्रकरणी डंपर चालक संतोष जामिरुद्दीन माल (सध्या राहणार शिर्के कंपनीजवळ, हनुमानवाडी केळगाव ता. खेड जि. पुणे) याच्यावर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची किसन एकनाथ थोरवे (वय ६५ रा. चऱ्होली खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान आरोपीला आळंदी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबतची माहिती अशी की,
तनिषाला आळंदीतील प्रियदर्शनी शाळेतून तिचे आजोबा किसन एकनाथ थोरवे हे दुचाकीहून घरी घेऊन जात होते. दरम्यान वडगाव रस्त्यावरील गोशाळेसमोर दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या भरधाव डंपरने जोरात धडक दिली. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने तनिषाला मोठी दुखापत होऊन मृत्यू झाला. तर तिचे आजोबा किसन थोरवे यांच्या डोक्याला, हाताला, पोटाला, कमरेला मार लागून ते जखमी झाले आहेत. अपघानानंतर ट्रक चालक घटनास्थळाहून पळून जात होता. मात्र स्थानिक तरुणांनी पाठलाग करून त्यास पकडले.
आळंदीतील अपघातात मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे. दि.१८ जुलै रोजी आळंदीतील वारकरी संप्रदायातील तरुण विद्यार्थ्यांचा वडगांव चौकात मृत्यू झाला होता. त्यामुळे आळंदी व चऱ्होली खुर्द या गावात शोककळा पसरली आहे.