पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू मिसाळ यांची निवड निश्चित मानली जात आहे. पक्षाच्या पालिकेतील गटनेतेपदी मिसाळ यांची नियुक्ती केल्याचा प्रस्ताव नगरसचिवांकडे प्राप्त झाला आहे. विरोधी प्रमुख पक्षाचा गटनेता हाच विरोधी पक्षनेता असतो. त्यामुळे मिसाळ यांच्या गटनेतेपदाच्या निवडीची नोंदणी पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे करण्यात येणार आहे. त्यानंतर महापौर माई ढोरे या मिसाळ यांच्या नियुक्तीची घोषणा करतील.
“पालिकेत सत्तारूढ भारतीय जनता पक्षापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. या पक्षाने विरोधी पक्षनेतेपदी दर वर्षी एका सदस्याला संधी देण्याचा धोरणात्मक निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. त्यानुसार पहिल्या वर्षी योगेश बहल, दुसऱ्या वर्षी दत्ता साने, तिसऱ्या वर्षी नाना काटे यांना संधी देण्यात आली. काटे यांनी दोन सप्टेंबरलाच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता.”
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले. त्यामध्ये मिसाळ यांच्यासह माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर, अजित गव्हाणे यांच्यात चुरस होती. त्यात मिसाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. निगडी-प्राधिकरण विभागातून मिसाळ तिसऱ्यांदा नगरसेवक झाले आहेत. यापूर्वी त्यांनी उपमहापौर, क्रीडा समिती सभापती, प्रभाग समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. ते स्थायी समितीचे दोन वर्षे सदस्यही होते. पालिकेची निवडणूक सव्वा वर्षांनी होणार आहे. त्यामुळे पालिकेत पुन्हा सत्ता आणण्यासाठी सत्तारूढ पक्षाविरुद्ध आक्रमक भूमिका घेणार असल्याचे मिसाळ यांनी सांगितले.