पिंपरी I झुंज न्यूज : कन्या विद्यालय पिंपरी येथे सोप्रास्टेरिया कंपनी मार्फत घेण्यात आलेल्या उपक्रमा अंतर्गत दिनांक 17 जून ते 27 जून या कालावधीत कराटे व नृत्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचा मंगळवारी समारोप समारंभ घेण्यात आला.
कार्यक्रमास उपस्थित सोप्रास्टेरिया कंपनीच्या सीएसआर प्रमुख चैत्राली इनामदार, विनोद मांजरेकर, अक्षय सर, राहुल शिंदे यांचा मा. मुख्याध्यापिका सौ शारदा शेटे व पर्यवेक्षिका सौ उर्मिला पाटील यांच्या शुभहस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात सोप्रास्टेरिया कंपनीच्या सीएसआर प्रमुख चैत्राली इनामदार यांनी विद्यार्थिनींना शिबिराचा उद्देश स्पष्ट केला आणि विद्यार्थिनींनी यातून प्रेरणा घ्यावी असे सांगितले.तसेच शाळेला विविध उपक्रमात सहभागी करून घेण्याचे व सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. नृत्य प्रशिक्षक श्री विनोद मांजरेकर, अक्षय सर व कराटे मास्टर श्री राहुल शिंदे सर यांनी विद्यार्थिनींची उत्कृष्ट प्रात्यक्षिके सादर केली.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ शारदा शेटे मॅडम यांनी शिबिरात सहभागी विद्यार्थिनींचे कौतुक केले व असेच सहशालेय उपक्रम राबवण्यासाठी कंपनीकडून यथोचित सहकार्य मिळावे असे मनोगत व्यक्त करताना सांगितले. या शिबिरात नृत्यासाठी 50 व कराटे साठी 50 अशा एकूण शंभर विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. सहभागी विद्यार्थिनींना कंपनीकडून शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. उर्मिला पाटील यांनी मानले. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील उपशिक्षिका सौ मीनल साकोरे यांनी केले.